संजय उवाच

सन २००४ ते सन २०१४ या काळात भारतीय राजकारणात काय काय झालं आणि देशभरात त्याचे काय काय आणि कसे कसे पडसाद उमटले ते सर्व भारतीयांनी अनुभवलं आहे, आणि सर्व १२५ कोटी जनतेची त्याच्याबद्दल आपापली मते असतील. ती मते बरोबर आहेत का चुक, भारतीय माध्यमांनी म्हणजे दूरचित्रवाणीवरील वृत्त वाहिन्या आणि वृत्तपत्रे यांनी त्या सर्व घटनांचे त्या त्या वेळी विश्लेषण कसे केले होते, त्या विश्लेषणात किती तथ्य होते याचा उहापोह करणे हा उद्देश ठेवून हा लेखनाचा उद्योग करत नाहीये. तर निमित्त आहे दिनांक ११/०१/२०१९ रोजी प्रदर्शित झालेला संजय बारू लिखित याच नावाच्या पुस्तकावर आधारित चित्रपट द ॲक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर.
इथे एक गोष्ट मी नमूद करू इच्छितो की मी हे पुस्तक किंवा त्याचा (उपलब्ध असल्यास) कोणताही अनुवाद वाचलेला नाही आणि इथे लिहिलेल्या सर्व गोष्टी या चित्रपटाबद्दलच आहेत.
अपेक्षेप्रमाणे चित्रपट सुरू होतो तो २००४ साली झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांचा निकाल आणि डॉक्टर मनमोहन सिंग यांची पंतप्रधानपदी निवड होणे या घटनांपासून. मंत्रिमंडळ निवडीच्या वेळी घडलेल्या काही सूचक घटना या दृष्यांमधे आहेत ज्या कदाचित सामान्य भारतीय जनतेला माहीत नाहीत. शपथविधी समारंभानंतरच्या मेजवानीच्या वेळेस त्या सभागृहात बॉडी हार्नेसवर बांधलेला कॅमेरा फिरत ही सगळी दृष्ये टिपत नवनिर्वाचित पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग, पक्षप्रमुख सोनिया गांधी आणि त्यांचा परिवार उभे आहेत, तिथे जात असताना एक व्यक्ती कॅमेरासमोर पाठमोरी येते आणि एका मेजापाशी उभी राहाते. पंतप्रधान त्या व्यक्तीला नजरेनेच थांब असे सांगतात. आणि थोड्या वेळाने ती व्यक्ती म्हणजेच पुस्तकाचे लेखक संजय बारू म्हणजेच अभिनेते अक्षय खन्ना, “सौ करोड की आबादीवाले इस देश को ये कुछ गिने चुने लोग चालते हैं। ये देश की कहानी लिखते हैं और मै, इनकी कहानी लेखता हूं!” असे म्हणत पडद्याच्या दोन मिती छेदून तिसऱ्या मितीत येतात आणि प्रेक्षकांबरोबर थेट संवाद साधतात! चित्रपट इथेच पकड घेतो आणि ती शेवटपर्यंत सुटत नाही.

पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदा आपल्या कार्यालयाकडे डॉक्टर मनमोहन सिंग जात असताना त्यांनी २००४ साली पंतप्रधानपद स्वीकारेपर्यंत ज्या काही महत्वाच्या हुद्द्यांवर काम केले होते त्या त्या वेळच्या वेशभूषेमधले डॉक्टर मनमोहन सिंग हे पंत्रप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांना अभिवादन करतात असे दाखवले आहे. हा प्रसंग फार उत्तम चित्रित केला आहे आणि त्यांची त्या त्या वेळची वेषभूषासुद्धा अचूक केली आहे.

इथून पुढे प्रेक्षकांना पाहायला मिळते त्या दहा वर्षांत दिल्लीत प्रधानमंत्री कार्यालयात घडणाऱ्या प्रमुख घटना आणि त्या अनुषंगाने तत्कालीन पंतप्रधानांच्या वैयक्तिक आयुष्यात घडणाऱ्या प्रमुख घटना यांचा एक कोलाज! अभिनेते अनुपम खेर यांनी तत्कालीन पंतप्रधानांची भूमिका साकारण्यासाठी घेतलेली मेहनत चित्रपटभर दिसते. चालणे, बोलताना केले जाणारे हातवारे म्हणजेच बॉडी लँग्वेजवर अनुपम खेर यांनी विषे लक्ष दिले आहे. आणि आवाजात केलेला बदल तर ऐकताच राहावा! ते ही भूमिका जगले आहेत असे म्हणणे वावगे ठरू नये. संपूर्ण चित्रपट तत्कालीन पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग आणि त्यांचे तत्कालीन माध्यम सल्लागार संजय बारू यांच्याभोवतीच फिरतो. त्या दोघांमध्ये निर्माण झालेले भावबंधसुद्धा योग्य प्रकारे दाखवले आहेत आणि ते बघायलाच हवेत. संजय बारू यांना बोलावताना डॉक्टर मनमोहन सिंग “संजया” अशी हाक मारताना दाखवले आहे आणि ते मला खूप आवडले. त्यांची माध्यम सल्लागार म्हणून नियुक्ती करताना पंतप्रधान त्यांना म्हणतात, “संजया, महाभारतमे संजय धृतराष्ट्रकी आंख और कान बने थे. तुम मेरी आंख और कान बनो!”

हा चित्रपटाचे कथानक खुद्द पंतप्रधान, त्यांचे स्वीय सचिव, माध्यम सल्लागार यांच्या भोवती आणि पी एम ओ म्हणजेच पंतप्रधान कार्यालय याठिकाणीच जास्त पुढे सरकते. त्यासाठी नेपथ्य उत्तमच असायला हवे होते आणि कला दिग्दर्शकांनी यात काहीही कमतरता ठेवली नाहीये. चित्रीकरणात ग्रीन स्क्रीन या प्रकाराचा मुबलक वापर केला आहे. पंतप्रधान कार्यालयाच्या बाहेर ज्या इमारती आहेत त्या आणि तिथे उभे असलेले सुरक्षा रक्षक हे कार्यालयाच्या खिडकीतून प्रेक्षकांना दिसत राहातात. चित्रपटाचे बरेचसे चित्रीकरण भारताबाहेर झाले असल्याने असे करणे आवश्यक होते, आणि म्हणूनच ते चतुर प्रेक्षकांच्या लक्षात येऊ शकते.

तत्कालीन पक्षप्रमुख सोनिया गांधी यांच्या भूमिकेत जर्मन अभिनेत्री सुझान बर्नेट शोभून दिसतात. इथे परदेशीच अभिनेत्री हवी होती कारण कोणत्याही परदेशी मूळ असलेल्या व्यक्तीने हिंदी बोलणे आणि मुळच्या भारतीय व्यक्तीने परदेशी व्यक्तीसारखे अडखळत किंवा त्या प्रकारच्या अक्सेंटमध्ये हिंदी बोलणे यात बराच फरक आहे. आणि सुझान यांनी परदेशी व्यक्तीचा हा हिंदी बोलण्याचा विकनेस उत्तम प्रकारे स्ट्रेंथमध्ये बदलवला आहे! राहुल गांधी यांच्या भूमिकेत अर्जुन माथूर आणि प्रियांका गांधी यांच्या भूमिकेत आहना कुमारा यांची निवड सार्थ आहे. या भूमिका साकारण्यासाठी या दोघांना विशेष मेहनत घ्यायला लागली नसावी असे वाटते. या दोघांचे चित्रपटाच्या कथानकातले स्थान महत्त्वाचे आहेच पण त्यांच्या भूमिकेला फार लांबी नाहीये. बाकी सर्व कलाकार ज्या व्यक्तीरेखा साकारत आहेत त्यांच्या सारखे दिसणे ही एक मुख्य गरज लक्षात ठेवून त्या त्या कलाकारांची निवड केली आहे. म्हणूनच डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या पत्नी श्रीमती गुरशरन कौर यांच्या भूमिकेत दिव्या सेठ, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या भूमिकेत रमेश भाटकर, माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांच्या भूमिकेत राम अवतार, लालकृष्ण अडवाणी यांच्या भूमिकेत अवतार सहानी आणि माजी पंतप्रधान दिवंगत पी व्ही नरसिंहा राव यांच्या भूमिकेत अजित सातभाई हे सर्व कलाकार शोभून दिसतात. तरीही या सपोर्टींग कास्टमध्ये सगळ्यात जास्त भाव खातात ते अहमद पटेल यांच्या भूमिकेत (तसे दिसत नसूनही) अभिनेते विपीन शर्मा! अक्षय खन्ना आणि त्यांचे काही निवडक प्रसंग उठावदार करण्यात या दोघांच्या अभिनयाबरोबरच ज्या ठिकाणी या प्रस्नागांचे चित्रीकरण झाले आहे तेथील परिसरही तितकाच कारणीभूत आहे आणि हे मोठ्या पडद्यावरच पाहायला हवे!

अक्षय खन्ना यांच्या अभिनयाबद्दल लिहिले नाही तर या चित्रपटाबद्दल कोणताच लेख पूर्ण होऊ शकत नाही. वर उल्लेख केल्याप्रमाणे “त्या त्या व्यक्तीसारखे दिसणे” हा एक मूळ निकष लावून कलाकारांची निवड झाली आहे. परंतु २०/०४/२०१४ रोजी संजय बारू लिखित द ॲक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर हे पुस्तक प्रकाशित होईपर्यंत संजय बारू हे कोण आहेत हे फार कमी भारतीयांना माहीत होते. त्यामुळे त्यांची भूमिका करणारा कलाकार त्यांच्यासारखाच दिसला पाहिजे अशी आवश्यकता दिग्दर्शकांना वाटली नसावी. म्हणूनच अक्षय खन्ना हे संजय बारू यांच्यासारखे आजिबात दिसत नसले तरीही ते वावगे वाटले नाहीये. त्यामुळे त्यांना त्यांचा सहज अभिनय करायला पूर्ण वाव होता आणि त्यांनी ही संधी योग्य साधली आहे असेच म्हणावे लागेल. म्हणूनच, “ये जीत आपकी जीत है, ये पी एम ओ आपका टर्फ है।” किंवा “ना ना ना ना। डॉक्टर सिंग मिन्स बिझनेस!” ही वाक्ये त्यांच्या कायिक आणि वाचिक अभिनयामुळेच लक्षात राहतात! संजय बारू यांच्या भूमिकेत अक्षय खन्ना हे सूत्रधारासारखे या चित्रपटात वावरतात आणि त्यांच्याच दृष्टीकोनातून सर्व घटना प्रेक्षकांना दिसतात म्हणून या लेखाला संजय उवाच हे नाव द्यावे असे मला वाटले.

अपॆक्षेप्रमाणे चित्रपट संपतो तो २०१४ साली झालेल्या निवडणुकांमध्ये झालेल्या सत्ता बदलाने. . . . . . . .

विजय रत्नाकर गुट्टे यांचा दिग्दर्शक म्हणून हा पहिलाच चित्रपट आहे असे कुठेही वाटत नाही. कथानकावर असलेली त्यांची घट्ट पकड चित्रपट बघताना क्षणोक्षणी जाणवते. ज्याला लूज एंड्स म्हणता येईल अशी एकही गोष्ट चित्रपटात दिसत नाही आणि माझ्यामते हे दिग्दर्शकाचे यश आहे.

भारतीय राजकारणावर भाष्य करणारे आणि राजकारणी व्यक्तींवर आधारित पात्रयोजना असलेले अनेक चित्रपट या पूर्वी प्रकाशित झाले आहेत. त्या सर्वच चित्रपटांमधील पात्रे आणि त्यांचे कथानक काल्पनिक होते. कदाचित द ॲक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर हा भारतीय राजकारणावरील पहिला चित्रपट असावा ज्यातील बहुतेक पात्रे म्हणजेच त्या व्यक्ती जिवंत आहेत आणि राजकारणात सक्रियसुद्धा आहेत. म्हणूनच पात्रांची आणि व्यक्तींची नावे आहेत तीच ठेवणे आवश्यक होते. शिवाय राजकारणाविषयी प्रगल्भ विचार असलेले भारतीय नागरिक हा बदल सहज स्वीकारतील अशी अशा ठेवायलाही भरपूर वाव आहे. भारतीय राजकारणावर आधारित असेच छान चित्रपट भविष्यातही बनतील आणि प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतील अशी अपेक्षा करून हा लेखनाचा उद्योग आजच्या पुरता थांबवतो. जय हिंद!

दिवस चौदावा पान चौदावे

१४/०१/२०१८
मुलुंड मुंबई

"हाऊ इज द जोश?" "हाय सर!"

गेली अनेक दशके भारतीय हिंदी चित्रपटांमधले व्हिलन हे डाकू तरी असायचे किंवा कोणी तरी वाममार्गाने कमावलेल्या पैशाच्या जोरावर ताकदवान झालेली काल्पनिक व्यक्ती. पण गेल्या १५ २० वर्षांतल्या चित्रपटांकडे पाहिले तर आपले शेजारी देश आणि त्यातील काही दुष्ट प्रवृत्तीची माणसे ही मुख्य व्हिलनच्या स्वरूपात दिसायला लागली होती. तरीही या चित्रपटांची कथानके काल्पनिकच असायची. मी कोणत्या चित्रपटांबद्दल लिहीत आहे आहे चतुर वाचकांच्या लक्षात आले असेलच! शेजारी देशांबरोबर झालेल्या प्रत्यक्ष युद्धावरचे, भारतात झालेल्या दहशदवादी हल्ल्यांवरचे किंवा विमान अपहरणाचे कथानक असलेले आणि इतर बराच मसाला भरलेले भरपूर चित्रपट आले आणि गाजलेही. परंतु नजीकच्या भूतकाळातील लक्षात राहिलेला दुर्दैवी हल्ला होता उरी येथील भारतीय लष्कराच्या तळावर १८/०९/२०१६ रोजी झालेला हल्ला. भारतीय लष्कराच्याच गणवेषात आलेल्या फक्त चार सशस्त्र हल्लेखोरांनी १९ भारतीय सैनिकांना ठार केले होते आणि त्यामुळे संपूर्ण देशाची भावना एकाच होती, प्रतिशोध! या सत्य घटनांवर आधारित आहे दिनांक ११/०१/२०१९ रोजी प्रदर्शित झालेला चित्रपट उरी: द सर्जिकल स्ट्राईक.

हा चित्रपट ज्या घटनांवर बेतलेला आहे, त्याच्या आधीच्या आणि नंतरच्या संबंधित घटना व घडामोडी सर्व भारतीयांना माहीत आहेत असे गृहीत धरून या चित्रपटाची कथा सांगण्यात आपणा वाचकांचा वेळ वाया न घालवता या चित्रपटाच्या सादरीकरणाबद्दल जास्त लिहीन म्हणतो. कारण आपण सर्व सुजाण वाचक उरी: द सर्जिकल स्ट्राईक हा चित्रपट आपल्या जवळच्या चित्रपट गृहात जाऊन पहालाच!

चित्रपट सुरू होतो तो ०४/०६/२०१५ रोजी मणिपूर राज्यातील चांदेल जिल्ह्यात भारतीय लष्कराच्या ताफ्यावर झालेल्या दहशदवादी हल्ल्याच्या घटनेने. बहुदा सर्वच युद्धपटांमध्ये, प्रवासात असताना सैनिक नेहमी आनंदात वीररसपूर्ण गाणी म्हणत जाताना दाखवले आहेत तसे या प्रसंगातही दाखवले आहे. त्या ताफ्यातल्या सगळ्यात पुढच्या बसचे टायर पंक्चर होते म्हणून चालक खाली उतरतो तेव्हा एखादा काटाकुटा घुसून टायर पंक्चर झाले नसावे, काहीतरी घातपात असावा हे त्या अभिनेत्याच्या चेहऱ्यावरचे भाव पाहूनच प्रेक्षकांना कळते कारण त्या अभिनेत्यावर रोखलेला कॅमेरा बसच्या पुढच्या चाकाकडे रोखला जातो आणि प्रेक्षकांना रस्त्यात मुद्दाम टाकलेले खिळे दिसतात! हे हल्लेखोर आपल्या पूर्वेकडील शेजारी देशामधून भारतात आल्याचे नंतर भारतीय लष्कराला कळले होते आणि भारताने “दुसऱ्या देशात जाऊन केलेली पहिली दहशदवाद विरोधी कारवाई” जी संपूर्ण भारताने नंतर बातम्यांमधून पाहिली आणि वाचली तीसुद्धा या चित्रपटात खूपच प्रभावीपणे दाखवलेली आहे. काही मोजक्या सैनिकांची एक तुकडी घेऊन मेजर विहान शेरगील (चित्रपटातील नाव) दहशदवाद्यांच्या या तळावर हल्ला करून सर्व दहशतवाद्यांना कंठस्नान घालून, त्यांची सर्व शस्त्रे आणि सामुग्री नष्ट करून, आणि विशेष म्हणजे एकही सैनिक न गमावता परत येतो आणि चांदेल हल्ल्याचा प्रतिशोध पूर्ण करतो असे दाखवले आहे.

या प्रतिशोधाचे यश साजरे करण्यासाठी आयोजित केलेल्या समारंभात मेजर विहान शेरगील, सर्व सैनिक, अधिकारी आणि आणि लष्कर प्रमुख उपस्थित असतात. राष्ट्रीय सुरक्षा सलागारांबरोबर (रा सु स) माननीय पंतप्रधान या समारंभात जात आहेत हे दृष्य या दोन कलाकारांच्या मागे मागे कॅमेरा ठेवून चित्रित केले आहे. उजवीकडे रा. सु. स. च्या भूमिकेत अभिनेते परेश रावळ आणि डावीकडे माननीय पंतप्रधान चालत आहेत आणि ते माननीय पंतप्रधानांना या यशस्वी मोहिमेबद्दल माहिती देत आहेत असे हे दृष्य आहे. या दृष्यात प्रेक्षकांना पंतप्रधानांची भूमिका करणाऱ्या अभिनेत्याचे पांढरे केस आणि दाढी दिसते, बाकीचा चेहरा नाही. म्हणून प्रेक्षकांना वाटते की माननीय पंतप्रधानांचा चेहरा दाखवणार नाहीत, जो या पूर्वीच्या काही अशा विषयांवरच्या चित्रपटांनी पाडलेला प्रघात होता. पण तसे न रहाता, रा. सु. स. आणि माननीय पंतप्रधान समारंभाच्या कक्षात आल्यावर बॉडी हार्नेसवर बांधलेला कॅमेरा या दोघांच्या समोर येतो आणि रजित कपूर हा अभिनेता माननीय पंतप्रधानांच्या भूमिकेत समोर येतो आणि हा प्रेक्षकांसाठी एक चांगला सुखद धक्का ठरतो! तरीही ते पंतप्रधान आहेत हा उल्लेख कुठेही केला नाहीये. त्यांना संबोधताना अन्य पात्रे, “सर” असेच म्हणताना दाखवले आहे. प्रेक्षकांनी समजून घ्यायचे की ते माननीय पंतप्रधान आहेत! या समारंभात अभिनेता योगेश सोमण हे तत्कालीन संरक्षण मंत्र्यांच्या भूमिकेत दिसतात. गृह मंत्र्यांची भूमिका करणाऱ्या अभिनेत्याचे नाव कळू शकले नाही पण तो अभिनेता बराचसा सध्याच्या गृह मंत्र्यांसारखा दिसतो. किंबहुना तसे दिसणे हाच निकष असावा त्या अभिनेत्याचा निवडीचा असे वाटते. इथे एक गोष्ट आवर्जून नमूद करावी लागेल. विक्रम गायकवाड यांनी सर्व अभिनेत्यांची रंगभूषा इतकी उत्तम केली आहे की तो कलाकार म्हणजे प्रत्यक्ष ती व्यक्तीच वाटावी!

सत्य घटनांवर आधारित हा चित्रपट असला तरी सर्व त्या घटनांमधील सर्व व्यक्तींची नावे तशीच न ठेवता पात्रांना वेगळी नावे देणे हे बरेचदा गरजेचे ठरते आणि त्या अनुषंगाने मूळ घटनाक्रमात नसलेले काही प्रसंग चित्रपटाच्या कथानकात पेरावे लागतात. मेजर विहानच्या अल्झायमर झालेल्या आईची भूमिका स्वरूप संपत यांनी उत्तम वठवली आहे. तर वर उल्लेख केलेल्या या समारंभात, “आई मला पूर्णपणे विसरण्याआधी मी काही दिवस दिल्लीत तिच्या सोबत राहू इच्छितो.” हे कारण सांगून मेजर विहान मुदतपूर्व निवृत्तीची मागणी करतो. त्यावर माननीय पंतप्रधान त्याची बदली दिल्लीतील मुख्यालयात करण्याची आणि आईसाठी एक पूर्णवेळ परिचारिका घरात ठेवण्याची सूचना करतात. अशाप्रकारे मेजर विहान कार्यरतही रहातो आणि दिल्लीत त्याच्या आईजवळही राहतो. तिथे असताना त्याच मुख्यालयात कार्यरत असलेल्या वायुदलातील एका महिला हेलिकॉप्टर पायलट सिरत हिच्याबरोबर त्याचा संपर्क येतो आणि प्रेक्षकांना वाटते की या दोघांमध्ये प्रेम संबध जुळले जाताना दाखवणार आहेत का? पण अशा वेगवान कथानकाच्या चित्रपटांमध्ये या गोष्टींना वेळ कुठे असतो? त्या पायलटवर एका बचाव मोहिमेत दिरंगाई दाखवल्याबद्दल “चौकशी” चालू असते म्हणून तिला कदाचित निलंबित न करता ती चौकशी पूर्ण होईपर्यंत दिल्लीतील मुख्यालयात कार्यरत ठेवलेले दाखवले आहे. आणि मेजर विहानच्या आईसाठी नियुक्त केलेली परिचारिका ही प्रत्यक्षात परिचारिका नसून एक कर्तबगार रॉ एजंट आहे हे रहस्य प्रेक्षाकांपासून फार काळ लपून राहात नाही. ज्या प्रसंगातून हे रहस्य उघड केले आहे तो प्रसंग सर्वच कलाकारांनी उत्तम वठवला आहे. यामी गौतम या गुणी अभिनेत्रीने पल्लवी शर्मा या रॉ एजंटची भूमिका व्यवस्थित निभावली आहे.

काल्पनिक प्रसंगांचा आणि पात्रांचा उल्लेख आलाच आहे तर हेसुद्धा नमूद करावे लागेल की मोहित रैना या अभिनेत्याने साकारलेला कॅप्टन करण कश्यप हा मेजर विहानचा मेहुणा दाखवला आहे. सुट्टीनंतर परत कामावर रुजू झाल्यावर कॅप्टन करण त्याच्या पत्नीबरोबर म्हणजे मेजर विहानच्या बहिणीबरोबर व्हिडीओ कॉलिंगच्या माध्यमातून संपर्कात रहाताना दाखवले आहे, जेव्हा तो परत एकदा बाबा होणार आहे हे त्याला कळलेले दाखवले आहे. असे प्रसंग युद्धपटांमध्ये का घालतात हे मला अद्याप कळले नाहीये!

चित्रपाटाचे कथानक पुढे सरकताना, हवाई दलाच्या पठाणकोट येथील तळावर ०२/०१/२०१६ रोजी झालेल्या हल्ल्याचे वार्तांकन वृत्तवाहिन्यांवर जसे दाखवले गेले होते तसे चित्रपटात दाखवले आहे. हा हल्ला चालू असताना सुरक्षा समितीच्या बैठकीत रा. सु. स., हे माननीय पंतप्रधान, आणि सुरक्षा समितीच्या अन्य सभासदांना सर्व माहिती पुरवतात आणि सशस्त्र दलांना कारवाईचे आदेश देतात असे दाखवले आहे. इथे एका विशेष तपशीलाकडे लक्ष दिले आहे आणि ते मला फार आवडले. मोबाईल फोनवर सुरक्षा विषयक कोणतीही माहिती अथवा बातमी आली, किंवा सशस्त्र दलांना मोबाईल फोनवरून सूचना देऊन झाली की रा. सु. स. तो मोबाईल हॅन्डसेट नष्ट करतात असे दाखवले आहे. काही वर्षांपूर्वी लोकप्रिय असलेले फ्लिप फोन यासाठी वापरले आहेत. आजच्या सारखे स्मार्ट फोन्स नाहीत. आणि तो हॅण्डसेट नष्ट करताना सामान्य परिस्थितीत जशी त्याची घडी घातली जाते त्याच्या विरुद्ध दिशेने वळवून तो हॅण्डसेट तोडलेला दाखवला आहे. मग रा. सु. स. यांचा स्वीय सचिव त्यांना दुसरा हॅण्डसेट देतो असेही दाखवले आहे. असे किती हॅण्डसेट खर्ची घातलेत हे मोजायला हवे होते!

मग येतो चित्रपटाचा मुख्य प्रसंग, उरी येथील तळावर झालेला दहशवादी हल्ला. याही प्रसंगात सर्व बंदुका, रॉकेट लाऊंचर्स आणि त्यांनी केलेले स्फोट हे खोटे वाटत नाहीत. प्रेक्षागृहातली सराउंड साउंड सिस्टिम प्रेक्षकांना ऑन द एज ऑफ द सीट ठेवते. या हल्ल्याची दृष्ये खूपच परिणामकारक आहेत. बराकींमध्ये असलेले नि:शास्त्र सैनिक दहशतवाद्यांच्या गोळीबाराला बळी पडताना पाहून प्रेक्षक व्यथित झाले नाहीत तरच नवल. सैनिकांच्या हल्ल्याला उत्तर देणाऱ्या जवानांचा एकमेकांमधला ताळमेळ फार उत्तम प्रकारे दर्शवला आहे. आणि तो इथे वाचण्यापेक्षा मोठ्या पडद्यावरच पाहावा! या हल्ल्यात कॅप्टन करण हुतात्मा होतो असे दाखवले आहे.

आता सुरू होते ती प्रतिशोधाची तयारी. पुन्हा एक सुरक्षा समितीची बैठक, पुन्हा थोडी चर्चा आणि मग ठरते प्रतिशोधाची पद्धत – सर्जिकल स्ट्राईक! रा. सु. स.च्या भूमिकेत परेश रावल यांनी जीव ओतलाय असे म्हणणे वावगे ठरू नये. “ये नया हिंदोस्ता है, ये अंदर घुसेगाभी और मारेगा भी!” असं म्हणताना आपले सैनिक गमावल्याचे दु:ख आणि एलिट फोर्सचे हे सैनिक हा प्रतीशोध यशस्वी करतीलच हा सार्थ आत्मविश्वास परेश रावल यांनी उत्तम प्रकारे दर्शवला आहे. सर्जन म्हणजे शल्यविशारद, एक असा डॉक्टर जो रुग्णाच्या शरीरात त्याच्या हत्यारांनिशी योग्य ठिकाणी पोहोचतो, दुखापत झालेल्या किंवा रोगी अवयवावर योग्य ते उपचार करतो, रोग पसरू नये याचे खबरदारी घेऊन शस्त्रक्रिया झालेला शरीराचा भाग पूर्ण बंद करून रुग्ण संपूर्ण बरा होईल याची खबरदारी घेतो. यात एखादी छोटीशी चूक रुग्णाच्या तब्येतीच्या दृष्टीने महाग पडू शकते. म्हणूनच अशा सर्जिकल प्रिसिजनने केलेल्या हल्ल्याला सर्जिकल स्ट्राईक हे किती सार्थ नाव आहे ना?

ज्या दोन रेजिमेंट्सचे सैनिक उरी येथील हल्ल्यात बळी पडले होते त्याच डोगरा आणि बिहार रेजिमेंट्सच्याच सैनिकांना या सर्जिकल स्ट्राईकसाठी तयार केलेले दाखवले आहे. प्रत्यक्षात तसेच घडले होते का हा सिनेमॅटिक लिबर्टीचा भाग आहे हा संशोधनाचा विषय आहे. २० सैनिकांची एक अशा ४ तुकड्या करून त्यांना अल्फा, ब्राव्हो, चार्ली आणि डेल्टा अशी नावे दिली जातात. पैकी ब्राव्हो, चार्ली आणि डेल्टा या तीन तुकड्या तीन वेगवेगळ्या हेलिकॉप्टर्समधून पुढे जातात आणि अल्फा टीम थोड्या विलंबाने निघते. या हेलिकॉप्टरची पायलट असते तीच मुख्यालयात ओळख झालेली कॅप्टन सिरत! अभिनेत्री कीर्ती कुल्हारी हिने ही छोटीशी भूमिका छान सादर केली आहे. आता या मुख्य सर्जिकल स्ट्राईक्सची दृष्ये चित्रित करणे हे लेखक दिग्दर्शक आदित्य धर यांच्या कल्पनाशक्तीवर अवलंबून होते आणि त्यात कुठेही कमतरता दिसली नाहीये. हे सर्व ८० सैनिक साकारणारे कलाकार हे खरोकरचे सैनिकच वाटतात!

या सर्जिकल स्ट्राईकची योजना ठरताना मेजर विहान शेरगील हा दिल्लीतील मुख्यालयात रुजू असतो. त्याला एवढेच कळते की उरी हल्ल्याच्या प्रतिशोधाची तयारी केली जात आहे. तो लगेच लष्कर प्रुमुखांकडे जाऊन त्याला या मोहिमेत समाविष्ट करण्याची विनंती करतो आणि सर्व सैनिकांना जिवंत परत आणायचे आश्वासन लष्कर प्रमुखांना देतो. मोहिमेच्या आधीच्या शेवटच्या बैठकीत माननीय पंतप्रधान या वचनाचा उल्लेख करतात तेव्हा मेजर विहान त्यांना म्हणतो, “विथ युअर परमिशन सर, आय अँड मय टीम वूड लाईक टू हॅव डिनर विथ यु आफ्टर वी कम बॅक!” आणि असं. म्हणतानाचा विकी कौशल या कलाकाराचा कायिक आणि वाचिक अभिनय फारच छान झाला आहे. चित्रपट संपतो तो या डिनर पार्टीच्याच प्रसंगाने! चित्रपटात इतर अनेक तपशील दाखवले आहेत, कधी विस्ताराने तर कधी सूचकपणे, पण ते सगळे इथे लिहीत बसलो तर या लेखाचा विस्तार अजून वाढेल. शिवाय ते सांगून वाचकांचा रसभंग नको व्हायला! कारण ते सारे तपशील आणि दोन भन्नाट सरप्राईज एलिमेंट्स हे सारे चित्रपटगृहातच जाऊन पहावेत असेच आहेत.

संपूर्ण चित्रपटाचेच चित्रिकरण उत्तम आहे. चित्रपटात वापरलेली सर्व शस्त्रे खरी असावीत अशीच वाटतात. त्यांच्या वापराने होणारे स्फोट आणि त्या स्फोटाने होणारे नुकसान हे अन्य चित्रपटांमधल्या अशाप्रकारच्या गोळीबाराच्या किंवा युद्धप्रसंगांपेक्षा अनेक पटींनी प्रभावीपणे चित्रित केले आहेत. आजकाल सर्व चित्रपटगृहांमध्ये सराउंड साउंड सिस्टीम असतेच. गोळीबाराचे आणि स्फोटांचे या सिस्टीममार्फत ऐकू येणारे आवाज या प्रसंगांची परिणामकारकता कैक पटींनी वाढवतात. जिथे हा सर्जिकल स्ट्राईक करायचाय त्या भागाच्या उपग्रह प्रतिमा संरक्षण विभागाकडे थेट प्रक्षेपित होण्याची व्यवस्था कशी केली गेली, वॉर रूममधल्या सर्व तांत्रिक गोष्टी, संगणकावर दिसणाऱ्या उपग्रह प्रतिमा मोठ्या पडद्यांवर दिसणे या टेक्नॉलॉजीच्या गोष्टी आतापर्यंतच्या भारतीय युद्धपटांमध्ये फार क्वचित दिसल्या होत्या त्या इथे दिसतात, आणि या चित्रपटाची निर्मिती मूल्ये किती उच्च आहेत याची साक्ष देतात. तसेच त्या प्रतिमांचा उपयोग करून दहशतवाद्यांची लाँच पॅड्स कशी ओळखली आणि त्या जागांचे कोऑर्डिनेट्स त्या चारही टीम्सकडे कसे पोहोचवले, मगाशी उल्लेख केलेले सरप्राईज एलिमेंट्स काय आहेत आणि त्याचा कसा उपयोग केला आहे हे बघणे हा एक उत्कृष्ठ अनुभव आहे. एकंदरीत या चित्रपटाचा प्रभाव चित्रपटगृहातून बाहेर आल्यावर बराच वेळ राहातो. आधुनिक काळातला हा सर्वोत्कृष्ठ युद्धपट ठरेल. हो युद्धपटच, कारण असे दहशवादी हल्ले हे प्रॉक्सी वॉरच असतात!

मोहिमेवर जाताना आणि मोहीम यशस्वी करून परत आल्यावर मेजर विहान आपल्या सहकाऱ्यांचे मनोबल उंचावण्यासाठी नेहमी म्हणत असतो, “हाऊ इज द जोश?” ज्यावर सारे सैनिक, “हाय सर!” असे म्हणजे ‘आमचा जोश, उत्साह हा उच्च आहे’ असे उत्तर देत असतात! म्हणूनच हा चित्रपट पाहून भारतीय सैन्यात आणि जनमानसात निर्माण झालेला जोश तसाच कायम राहावा आणि ज्या कारणासाठी हा सर्जिकल स्ट्राईक करावा लागला, तशी कारणेच पुन्हा उद्भवू नयेत ही इच्छा व्यक्त करून आजच्या पुरता हा लेखनाचा उद्योग थांबवतो. जय हिंद!

दिवस अकरावा पान अकरावे
११/०१/२०१८
मुलुंड मुंबई

ता. क.:

अचानक या चित्रपटाचे केलेले रसग्रहण वाचल्यावर अनेकांनी टिपण्णी केली होती की प्रमुख कलाकारांची नावे आणि त्यांनी साकारलेल्या भूमिका, दिग्दर्शक यांची यादी लिहावी. ती पुढील प्रमाणे:

मेजर विहान शेरगील: विकी कौशल
कॅप्टन कारण कश्यप: मोहित रैना (पदार्पण)
वायुदलातील कॅप्टन सिरत: कीर्ती कुल्हारी
रॉ एजंट पल्लवी शर्मा: यामी गौतम
पंतप्रधान: रजित कपूर
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार: परेश रावळ
संरक्षण मंत्री: योगेश सोमण
मेजर विहानची आई: स्वरूप संपत

लेखक आणि दिग्दर्शक: आदित्य धर
निर्माते: रॉनी स्क्रूवाला
निर्मिती संस्था: आर एस व्ही पी
संगीत: शैशव सचदेव
चित्रीकरण प्रमुख: मितेश मिरचंदानी
संकलन: शिवकुमार पाणीककर
रंगभूषा: विक्रम गायकवाड

चुकीची दुरूस्ती: आज दिनांक २५/०१/२०१९ रोजी पुन्हा एकदा हा चित्रपट पहाताना ‘करण कश्यप’चा लष्करातला दर्जा कॅप्टन नसून मेजर आहे हे लक्षात आले. मुळ लेखात बदल न करता तळटिप म्हणून ही दुरुस्ती केली आहे. चुकी बद्दल क्षमस्व!

आवर्जून पाहावा असा चित्रपट – अचानक (१९७३)

गुलजार यांनी लिहिलेली चित्रपट गीते आवडत नाहीत असे चित्रपट रसिक खूपच कमी, अगदी हाताच्या बोटावर मोजण्या इतकेच असतील. त्यांचे चित्रपट दिग्दर्शनही अनेकांना आवडत असेल. बरेच चित्रपट असे आहेत ज्यात त्यांचे दिग्दर्शन आणि गीतलेखन दोन्ही आहेत. तरीही इथे उल्लेख करावासा वाटतो तो त्या एका चित्रपटाचा ज्याचे दिग्दर्शक गुलजार साहेब आहेतच पण स्वत: गीतकार असूनही त्यांच्या या चित्रपटात एकही गाणे नाहीये! होय, नुकताच पाहण्यात आलेला हा चित्रपट म्हणजे १९७३ साली प्रदर्शित झालेला, स्वर्गीय अभिनेते आणि सांसद विनोद खन्ना यांची प्रमुख भुमिका असलेला चित्रपट अचानक. 

दिग्दर्शक गुलजार असूनही त्यांनीच रचलेली गाणी या चित्रपटात नाहीत हे जसे या चित्रपटाचे वेगळेपण आहे तसेच साधारणपणे अडीच तीन तास कालावधीचे चित्रपट बनत असण्याच्या काळातला हा चित्रपट फक्त दीड तास कालावधीचा आहे हे ही या चित्रपटाचे वेगळेपण आहे! तसे म्हणायला गुलजार यांनीच दिगदर्शित केलेल्या आणि विनोद खन्ना यांचीच प्रमुख भूमिका असलेल्या मेरे अपने या चित्रपटातले स्वर्गीय किशोर कुमार यांच्या आवाजातले “कोई होता जिसको अपना हम अपना कह लेते” हे गीत पार्श्वसंगीताच्या स्वरूपात चित्रपटाच्या शेवटी वाजते. पण “अचानक” या चित्रपटाची स्वतःची अशी गाणी नाहीत. चित्रपटातील अन्य प्रमुख कलाकार म्हणजे स्वर्गीय इफ्तेकार, स्वर्गीय ओम शिवपुरी, लिली चक्रवर्ती, असरानी, फरीदा जलाल आणि इतर. 
विनोद खन्ना यांनी साकारलेला लष्करातील अधिकारी मेजर रणजीत खन्ना याची ही कथा आहे. इफ्तेकार यांनी साकारलेला कर्नल बक्षी आणि मेजर रणजीत यांच्या फ्लॅशबॅक मधून प्रेक्षकांच्या समोर येते. कारण चित्रपाटातल्या प्रमुख घटनांचे हे दोघेच मुख्य साक्षीदार आहेत. रणजीत खन्ना लष्करातील अधिकारी होण्याचे प्रशिक्षण घेत असताना त्याची वाग्दत्त वधू पुष्पा बक्षी त्याला लेखी पत्र पाठवण्याऐवजी ऑडिओ कॅसेटवर रेकॉर्ड करून पत्र पाठवत असे. अभिनेत्री लिली चक्रवर्ती यांनी ही भूमिका अतिशय ताकदीने साकारलेली आहे. त्या पत्रात एकदा पुष्पाने स्वतः गायलेले एक गीत असते जे परेडच्या वेळी ऐकत असताना तो पकडला जातो. त्यामुळे त्याला कर्नल बक्षी यांच्याकडून शिक्षाही भोगावी लागते आणि, “तू अशाच चुका करत राहिलास तर तुझे पुष्पाबरोबर ठरलेले लग्न तोडावे लागेल!” अशी धमकीही मिळते रणजितला. पुष्पा कर्नल बक्षीचीच मुलगी होती हा उलगडा प्रेक्षकांना तेव्हा होतो जेव्हा कर्नल बक्षी हे ओम शिवपुरी यांनी साकारलेल्या डॉक्टर चौधरी यांना मेजर रणजीत बद्दल सांगत असतो, “मी त्याला शिक्षा करत असे पण त्याचे उदाहरण अन्य प्रशिक्षणार्थींना देत असे.” असे सांगताना कर्नल बक्षी यांना आनंद आणि दु:ख दोन्ही होत असते. “शत्रूला ठार मारण्यासाठी ज्या पद्धती मेजर रणजित शिकला त्याच पद्धती आपल्या सगळ्यात जवळच्या व्यक्तींना मारण्यासाठी त्याला वापराव्या लागल्या.” हे सांगताना हतबल झालेला कर्नल बक्षी इफ्तेकार यांनीच सादर करावा!
एका काल्पनिक युद्धात “खडकाली चौकी”चे संरक्षण करताना शत्रूच्या अनेक सैनिकांना कंठस्नान घातल्याबद्दल मेजर रणजितला “वीर चक्र” हा सन्मान दिला जातो. ते पदक महू येथे कर्नल बक्षी यांना दाखवून मेजर रणजित आपल्या घरी जातो. तिथे त्याला कळते की पुष्पा त्याचा मित्र प्रकाशबरोबर, ज्याचा उल्लेख मेजर रणजित नेहमी “सिव्हिलियन” असा करत असतो, प्रकाशाच्याच बोट हाऊसवर मासे पकडण्यासाठी गेलेली असते. अभिनेते रवी राज यांनी ही छोटीशी भूमिका चोख बजावली आहे. त्या बोट हाऊसपाशी गेल्यावर मेजर रणजीतला पुष्पा आणि प्रकाश यांच्यातील विवाहबाह्य संबंधांबद्दल कळते आणि तो अतिशय दु:खी होतो. त्या रागात मेजर रणजित प्रकाशाची कदाचित दुसऱ्या दिवशी प्रकाशच्याच बोट हाऊसवर स्वतःच्या घरातल्याच एका चाकूने हत्या करतो आणि त्याच रात्री पत्नी पुष्पाला गळा आवळून ठार मारतो. या दोन्ही हत्या करतानाची दृष्ये चित्रपटात नाहीत. प्रकाशला मारल्यानंतर चाकू पाण्यात फेकून दिलेला आणि आजूबाजूचे पाणी लाल झालेले दाखवले आहे. तर पुष्पाला मारताना फक्त तिच्या गळ्याभोवती हात आवळलेला दाखवला आहे. आणि ही गुलजार यांच्या दिग्दर्शनाची जमेची बाजू आहे. कोणतीही हिंसा प्रत्यक्ष न दाखवता या दोन्ही हत्या करतानाचा मेजर रणजित याचा उद्वेग आणि राग प्रेक्षकांपर्यंत योग्य प्रकारे पोहोचतो आणि अपेक्षीत परिणामही साधतो. तरीही या प्रसंगांचे संकलन अर्थात एडिटिंग अजून चांगले होऊ शकले असते असे मला वाटते. 
यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी गणवेषधारी मेजर रणजित मृत पत्नी पुष्पांचे डोके मांडीवर घेऊन पलंगावर बसलेला दाखवला आहे आणि सैन्यातले त्याचे वरिष्ठ अधिकारी त्याच्या घरी येतात आणि आपली टोपी, पदके आणि कंबर पट्टा त्यांच्या हवाली करून शरण आलेला मेजर रणजित त्यांच्या बरोबर निघून जातो. इथेही मेजर रणजित त्याच्या वरिष्ठांकडे त्याने केलेल्या गुन्ह्यांची कबुली देत आहे असे दाखवण्यात चित्रपटाची रिळे आणि प्रेक्षकांचा वेळ वाया न घालवता चित्रपटाचा वेग कायम राखला गेला आहे. नंतर न्यायालयात दोन हत्या केल्याबद्दल मेजर रणजितला देहदंडाची शिक्षा ठोठावली जाते तेव्हा अत्यंत दु:खी झालेला मेजर रणजित तुरुंगात जाण्याआधी स्वतः:च्या घरी जाऊन पत्नीच्या आत्म्यास सद्गती मिळावी याची प्रार्थना करण्याचे परवानगी न्यायाधीशांकडे मागतो, जी त्याला मिळते. 
ज्याला “डेकोरेटेड आर्मि ऑफिसर” म्हणतात असा मेजर रणजित असल्यामुळे असेल कदाचित, पण पोलिसांबरोबर स्वतःच्या घरी जाताना त्याच्या हातात बेड्या नसतात. याचा फायदा घेऊन पहिल्या किंवा दुसऱ्या मजल्यावरच्या घरातच्या खिडकीतून पडद्याच्या साहायाने खाली उतरून मेजर रणजित तिथून पळून जातो. असे पळून जाण्याचे कारणही प्रेक्षकांना फ्लॅशबॅकच्याच स्वरुपात कळते. मेजर रणजित पुष्पाबरोबर गप्पा मारत असताना ती तिच्या मृत्यूनंतर तिचे मंगळसूत्र गंगेत विसर्जित करावे अशी इच्छा ती व्यक्त करते. ते तिचे मंगळसूत्र रणजितला पलंगावर उशीखाली सापडते. आणि ते गंगेत विसर्जित करण्यासाठी तो पोलिसांना गुंगारा देऊन घरातून पळून जातो. पण पळून जाताना रणजितचे बुट तिथेच, त्याच खोलीत रहातात.
नंतर सुरू होतो तो एक जीवघेणा पाठलाग ज्यात वासावरून माग काढणारे कुत्रे अर्थात स्निफर डॉग्ज बरोबर घेऊन पोलीस रणजितचा जंगलातून पाठलाग करायला लागतात. घरात राहिलेले रणजीतचे बुट बरोबर घेऊन पोलीस त्याचा पाठलाग सुरू करतात. हा सगळा पाठलाग जंगलातून झालेला दाखवला आहे. त्यामुळे अनवाणी घावल्यामुळे रणजितच्या तळपायाला झालेल्या जखमासुद्धा त्याला थांबवत नाहीत. असं जंगलातून अनवाणी धावताना रणजितला त्याच्या  एका सहकाऱ्याबरोबर झालेला त्याचा संवाद आठवतो आणि तिथे असलेल्या दोन झाडांभोवती रणजित इंग्रजी 8 या आकारात धावतो जेणेकरून वासावरून माग काढणारे कुत्रे अडखळतात आणि तिथेच तिथेच फिरत बसतात. पुढे धावत जाताना रणजित एका टेकाडावर चढत असताना पाठलाग करणाऱ्या पोलीसांना तो दिसतो आणि त्या टेकडीच्या सर्वात वरच्या भागावर पोहोचल्यावर पोलीस रणजितवर गोळी झाडतात, जी त्याच्या छातीतून आरपार जाते! इथे असे दाखवले आहे की मेजर बक्षीच्या हातात त्याच्या दिवंगत पत्नीचे मंगळसूत्र आहे आणि समोर गंगा नदीचा किनारा आहे. . . . . . . . . . . 
मगाशी सांगितल्याप्रमाणे इथपर्यंतची कथा ही कर्नल बक्षी आणि मेजर खन्ना या दोघांच्या फ्लॅशबॅकमधून प्रेक्षकांच्या समोर येते. कर्नल बक्षींकडून हे सगळे ऐकत असताना डॉक्टर चौधरीसुद्धा भावूक झालेले दाखवले आहेत. कमलदीप या अभिनेत्याने पोलीस सुपरिटेंडंटन्ट गुप्ता यांची छोटीशी भूमिका केली आहे. डॉक्टर चौधरी त्यांच्याबरोबर बोलताना त्यांचा उल्लेख फक्त “मिस्टर गुप्ता” असा करत असतात. पण ते पोलीस सुपरिटेंडंटन्ट आहेत हे प्रेक्षकांना शेवटीच समजते. गुप्ता आणि डॉक्टर चौधरी यांच्या संवादाचा मुद्दा हा असतो, “हृदयाच्या इतक्या जवळून, एका फुफ्फुसाला अर्धे अधिक नष्ट करून बंदुकीची गोळी आरपार गेली तरीही हा माणूस (मेजर खन्ना) जिवंत कसा काय?

दोन शस्त्रक्रिया झाल्यानंतर काही दिवसांनी रणजित पूर्ण बरा होतो. या कालावधीत ज्येष्ठ अभिनेते असरानी यांनी साकारलेला डॉक्टर कैलाश आणि ज्येष्ठ अभिनेत्री फरीदा जलाल यांनी साकारलेली परिचारिका राधा यांच्याबरोबर रणजिताचे चांगले स्नेह संबंध जुळतात आणि ते वेगवेगळ्या लहान मोठ्या प्रसंगातून प्रेक्षकांच्या समोर येतात. बंदुकीच्या गोळीमुले झालेल्या जखमेतून आणि त्या बरोबर झालेल्या अन्य गुंतागुंतीमधून बरे होताना त्या रुग्णालयात रणजितची परत एकदा पूर्ण तपासनी होते ज्याचे अहवाल एकदम योग्य असे येतात. त्यानंतर डॉक्टर चौधरी रणजितच्या खोलीत त्याच्या तब्येतीची चौकशी करतात आणि रणजितला बरे वाटत आहे हे कळल्यावर म्हणतात, “आता मला एक अतिशय वाईट काम करायला लागणार आहे!” असे म्हणून ते पोलीस अधिकारी गुप्ता यांना हाक मारतात. या आधी डॉक्टर चौधरींबरोबर रणजित विषयी चर्चा करताना ते गणवेशात नसतात परंतु इथे रणजितला परत अटक करायला आलेले पोलीस सुपरिटेंडंटन्ट गुप्ता हे गणवेशात समोर येतात आणि रणजितला पुन्हा अटक करून नेतात. रुग्णालयाच्या “प्रिझनर्स वॉर्ड”मधून बाहेर पडताना रणजितची डॉक्टर कैलास बरोबर फक्त एक अस्वस्थ नजारा नजर होते आणि सगळे तितून बाहेर पडतात. रुग्णालयाच्या बाहेर कर्नल बक्षी दिसतात तेव्हा त्यांना एक मानवंदना द्यायला अर्थात सॅल्यूट करायला रणजित विसरत नाही!

इकडे डॉक्टर कैलाश रुग्णालयाच्या “प्रिझनर्स वॉर्ड”मध्ये तुरुंगातून पाळताना डोक्यात पोलिसांची गोळी लागलेला अजून एक रुग्ण आल्याची माहिती डॉक्टर चौधरींना देतो आणि अत्यंत दु:खी झालेले डॉक्टर चौधरी राजीनामा देण्याच्या विचारात असतानाच, डॉक्टर म्हणून असलेल्या त्यांच्या कर्तव्याची त्यांना जाणीव होते आणि ते पुन्हा कैदी रुग्णाची शस्त्रक्रिया करायला डॉक्टर कैलाश आणि परिचारिका राधा यांच्याबरोबर जातात आणि दुसरीकडे रणजितला फाशी देतात. . . . . . . .

नौदल अधिकारी कावस माणेकशॉ नानावटी यांनी सन १९५९ मध्ये, मुळची ब्रिटिश असलेली आपली पत्नी सिल्व्हियाचा प्रियकर प्रेम भगवान अहुजा याची हत्या केली होती आणि ते त्यातून तेव्हा निर्दोष मुक्त झाले होते. या मुळ घडामोडी नौदल अधिकाऱ्याच्या आयुष्यात घडल्या होत्या परंतु अचानक या चित्रपटाची कथा बांधताना काही प्रमुख बदल केले आहेत ते म्हणजे मेजर रणजित सैन्यातला अधिकारी दाखवला आहे आणि कर्नल बक्षी त्याचे सासरे दाखवले आहेत. 
अनेक हिंदी चित्रपटांचे व्हिडिओ वितरणाचे हक्क ज्यांच्याकडे आहेत त्या शेमारू व्हिडिओच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर हा चित्रपट HD स्वरूपात उपलब्ध आहे. रसिकांनी त्याचा आस्वाद घ्यावा.
अक्षय कुमार यांची प्रमुख भूमिका असलेला २०१६ मध्ये आलेला रुस्तोम हा चित्रपट याच घटनांवर बेतलेला होता रसिकांना आठवत असेलच. नसेल तर तशी आठवण करून देऊन आजच्या पुरता हा लेखनाचा उद्योग थांबवतो.
दिवस तीनशे त्रेचाळीसवा. पान तीनशे त्रेचाळीसवे.
मुलुंड मुंबई
०९/१२/२०१८ 
 

स्त्री परिक्रमा – Journey of Woman

ही blog post लेखनाचा उद्योग मध्ये लिहावी का प्रकाशचित्रणाचा उद्योगमध्ये ह्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यात आजचा दिवस गेला! मुळात हा प्रश्न पाडण्याचं कारण म्हणजे स्त्री परिक्रमा – Journey of Woman”या नाट्याविष्काराचं प्रकाशचित्रण मी केलं आणि याबद्दल व्यक्त व्हावं ते शब्दांतून का प्रकाशचित्रांच्या माध्यमातून हे ठरवावं लागलं, आणि म्हणूनच हा प्रश्न पडला. प्रकाशचित्रणाच्या तांत्रिक बाबींबद्दल लिहिण्यासारखं इथे काही नाहीये, किंबहुना तो हेतूही नाहीये. लिहायचं आहे, व्यक्त व्हायचं आहे ते या नाट्याविष्काराबद्दल, हे ठरवल्यावर हा लेखनाचा उद्योग सुरू केला!
मुलुंड पश्चिम येथील महाराष्ट्र सेवा संघ इथे हानाट्याविष्कार दिनांक २८/०३/२०१८ रोजी सादर झाला. सादरकर्ते होते सरस्वती नृत्य कला मंदिर आणि महाराष्ट्र सेवा संघ, मुलुंड. याला पार्श्वभूमी होती नुकत्याच साजऱ्याझालेल्या आंतरराष्ट्रीय महिला दिनाची. मेधा दिवेकर यांची ही संकल्पना. त्यांच्यासोबत ८ वर्षे ते ५० वर्षे वर्षे वयाच्या ३३ अन्य स्त्री कलाकारांनी हा जवळ जवळ दोन तासांचा नाट्याविष्कार सादर केला. मुलुंडमधील सुप्रसिद्ध संस्कृत भाषा तज्ज्ञ् पंडित प्रभाकर भातखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा नाट्याविष्कार साकारला गेला आहे. कथक नृत्य, जोडीला मुद्राभिनय आणि साजेसं पार्श्वसंगीत अशी काहीशी यानाट्याविष्काराची मांडणी होती. वेदकालापासून एकविसाव्या शतकापर्यंतचा स्त्रीचा प्रवास म्हणजेच हा स्त्री परिक्रमा – Journey of Woman”हा नाट्याविष्कार!
हो, नाट्याविष्कारच. कारण हजारो वर्षांपासून स्त्रियांचं भारतीय समाजात काय स्थान होतं आणि ते काळानुसार कसं बदलत गेलं, स्त्रियांना कोणकोणत्या स्थित्यंतरातून जावं लागलं, त्यांच्यावर कसे अत्याचार झाले, त्या अत्याचारांचा प्रतिकार स्त्रियांनी कसा केला हे सर्व आयाम दोन घटिकांमध्ये सादर करायचं तर त्यात नाट्य हे येणारच! मग या नाट्याविष्काराची मांडणी ठरली, शे दोनशे आसनक्षमतेच्या प्रेक्षागृहात हा नाट्याविष्कार कसा सादर करायचा हे ठरलं, प्रकाशयोजना ठरली, नेपथ्य ठरलं आणि जोडीला अविरत सुरू होत्या तालिमी. या सर्व कलाकार मुली आणि स्त्रिया आपापली घरं, शाळा, महाविद्यालये, परीक्षा, नोकरी-व्यवसाय हे सर्व लीलया सांभाळून रोज रात्री सराव करत होत्या. माझ्या एका मित्राच्या मुलीनेही यात सहभाग घेतला होता. त्यानेच photographyसाठी माझे नाव मेधाताईंना सांगितले. नाहीतर मला असा काही कार्यक्रम आहे हे मला कळण्याचा काहीच मार्ग नव्हता! आणि कळलं असत. तरी कदाचित एक प्रेक्षक म्हणून माझी हजेरी लागली असती. या मित्राच्या सांगण्यावरूनच मी यांच्या तालिमींचेही प्रकाशचित्रण केले आणि मुख्य कार्यक्रमाचेही. आणि म्हणूनच मला हा कार्यक्रम जवळून पहाता आला, ही संकल्पना अनुभवता आली. 
ही नृत्य नाटिका सुरू होते ती पार्वतीने समकालीन स्त्रियांना नृत्यकला शिकवली या प्रसंगाने. आणि पुढे रामायण, महाभारत असा कालप्रवास करून हा नाट्याविष्कार येतो भारतावर झालेल्या परकीय आक्रमणांच्या काळाकडे.
रामायणकाळातला सर्वात उत्तम सादर झालेला प्रसंग म्हणजे सीता भूगर्भात विलीन होते तो. आता रंगमंच दुभंगणे शक्य नव्हते. मग रंगमंचाच्या दोन्ही बाजूंनी काही कलाकार एकमेकांच्या जवळ येतात आणि त्यांच्या मध्ये सीता लुप्त होते अशा प्रकारे हा प्रसंग सादर केला आहे आणि तो बघणे हा एक सुंदर अनुभव आहे!


सीता भूगर्भात विलीन होते

त्यानंतर हा नाट्याविष्कार पुढे सरकतो महाभारत काळाकडे. यात महाभारतीय युद्धानंतर कुंती आणि गांधारीबरोबर द्रौपदी चर्चा करत आहे अशा प्रकारे हा कालखंड सादर केला आहे. 
गांधारी आणि कुंती महाभारतीय युद्धानंतर

हे युद्ध का घडलं, टाळता आलं असतं का असे काही प्रश्न विचारून, प्रेक्षकांना विचाराधीन करून नाट्याविष्कार पुढे सरकतो तो भारतावर झालेल्या परकीयांच्या आक्रमणाकड़े. घोड्यांच्या टापांच्या पार्श्वसंगीताच्या ठेक्यावर प्रेक्षागृहातूनच या कलाकार रंगमंचावर प्रवेश करतात. हा प्रसंग पाहताना, अनुभवताना अंगावर अक्षरश: काटा येतो!


परकीय आक्रमक येतात त्या प्रसंगात कलाकार प्रेक्षागृहातून प्रवेश करतात

या नंतरच्या भागात पुरुषसत्ताक कालखंडात स्त्रियांवर होणारे अत्याचार फारच प्रभावीपणे सादर केले आहेत. घरात कुलदीपकअर्थात मुलगा जन्माला आल्यानंतर त्या मुलाचे होणारे कौतुक आणि त्याच्या आईची आणि त्या आईच्या मोठ्या मुलीची होणारी हेटाळणी, पतीच्या निधनानंतर पत्नी सती जाणे, जरठ-कुमारी विवाह हे प्रसंग लक्षात राहातात. या भागात रंगमंचावर इतके प्रसंग एका वेळी घडत असतात की प्रेक्षकांना सगळीकडे लक्ष ठेवावे लागते! 
स्त्री शक्ती

पुढे मग सुधारणांचा काळ येतो. यात शिक्षणापासून वंचित राहिलेल्या स्त्रियांना शिकून समृद्ध आणि सक्षम होताना दर्शवलं आहे. क्रीडा, चित्रपट, व्यवसाय यासह सर्व क्षेत्रांत पुरुषांच्या बरोबरीने स्त्रिया सहभागी होतात, कदाचित एक पाऊल पुढेच असतात; घर, मुले, त्यांचं शिक्षण या सर्व आघाड्या सांभाळून स्वतःच्या कारकिर्दीलाही आकार देतात हे दर्शविताना व्यसनाधीनतेकडे आकृष्ट होतानाही दिसतात! पण अन्य स्त्रियाच त्यांना यापासून परावृत्त करतात हा संदेशही दिला आहे. 
अशापराकारे हजारो वर्षांचा कालखंड केवळ दोन तासांत दर्शवणे हे एक मोठे आव्हान आहे आणि ते या सर्व ३३ कलाकारांनी अतिशय उत्तम प्रकारे पेललं आहे. कार्यक्रम संपल्यानंतर सर्व कलाकारांच्या चेहऱ्यावरून समाधान ओसंडून वहातांना दिसत होतं. सर्व कलाकारांची महिना दोन महिन्यांची मेहनत कामी आली होती हे कळत होतं त्यांच्याकडे पाहून.

या नाट्याविष्काराच्या तालिमींचे आणि प्रत्यक्ष सादरीकरणाचे प्रकाशचित्रण करणे हा एक समृद्ध करणारा अनुभव होता. असे नाट्याविष्कार घडत असताना कलाकारांना आणि सर्व चमूला काय मेहनत घ्यावी लागते हे जाणून घेता आलं. दिग्दर्शिकेला काय अभिप्रेत आहे आणि कलाकारांनी ते कशाप्रकारे सादर केलं पाहिजे हे कळलं. या अनुभावाचा पुढे काय आणि कसा उपायोग होईल ते काळच ठरवेल. परंतु प्रकाशचित्रणाच्या काही वेगळ्या आयामांकडे लक्ष देता आलं हे माझ्यासाठी खासच आहे. 
अशा नाट्याविष्कारांचा भाग होण्याच्या संधीबरोबरच, अशा सादरीकरणाचे बारकावे जाणून घेण्याची आणि जोडीला प्रकाशचित्रणाचीही संधी मला वारंवार मिळेल अशी अपेक्षा करून आजच्या पुरता हा लेखनाचा उद्योग थांबवतो. 
दिवस अठ्ठ्याऐंशीवा पान अठ्ठ्याऐंशीवे 
मुलुंड मुंबई 
२९/०३/२०१८ लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी

विष्णु वामन शिरवाडकर अर्थात वि. वा. शिरवाडकर यांच्या मराठी साहित्यातल्या उल्लेखनीय कामगिरीचा सन्मान म्हणून त्यांना १९८७ साली ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. तेव्हापासून २७ फेब्रुवारी हा त्यांचा जन्मदिवस, मराठी भाषा गौरव दिन किंवा मराठी राजभाषा दिवस म्हणून साजरा केला जातो. 
मराठी ही माझी मातृभाषा आणि पितृभाषाही असल्यामुळे शुद्ध (शुध्द नाही) मराठी लिहिण्याकडे आणि बोलण्याकडे माझा कल असतो. म्हणूनच हा लेखनाचा उद्योग मराठीत चालू केला. 
आणि , आणि , आणि , आणि या अक्षरांचा उच्चार आणि लिखाणातला वापर हा बरोबरच असायला हवा. यांची अदलाबदल झाली तर भलताच अर्थ होतो! ‘आणि’मधला णि ऱ्ह्स्व (इथे माझ्या संगणकावर र्हस्व असे लिहिले जात होते, जे बरोबर नाही. म्हणून mobileवर लिहून हा शब्द इथे आणला) असतो, पाणी मधला णी दीर्घ असतो हे भान ठेवायला हवे. इथे पाणी ऐवजी पाणि झाले तर जल ऐवजी हात असा अर्थ होतो. लग्नात नवरदेव वधूचे पाणिग्रहण करतो, पाणीग्रहण नाही! एकदा एका शाळेत मराठीच्या परीक्षेत प्रश्न विचारला गेला, “पाच वहाणांची नावे लिहा” हा प्रश्न वाचून बहुतेक विद्यार्थ्यांनी चपला बनवणाऱ्या आस्थापनांची (companiesची) नावे लिहिली. त्या सर्व मुलांना या प्रश्नात शून्य गुण मिळालेले पाहून सगळे पालक हादरले आणि शिक्षकांकडे गेले. तेव्हा ते शिक्षक म्हणाले, “मुलांना पाच गाड्यांची नावे (वाहनांची नावे) लिहायला सांगितली होती. त्यांनी चपलांची नावे लिहिली!” अशा प्रकारच्या चुका टाळल्याच पाहिजेत. परीक्षेत विचारलेला हा प्रश्न व्याकरणदृष्ट्या कदाचित बरोबर असेल पण अशुद्ध नक्कीच आहे. तसेच अशा चुकीमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान झाले त्याला कोण जबाबदार आहे? 
मराठीत बोलताना आणि लिहिताना अजून काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत त्या अशा: 
आपल्याला माणूस भेटतो, मिळत नाही. हरवलेली वस्तू मिळते किंवा सापडते, भेटत नाही. गाणे म्हणतात किंवा गातात, बोलत नाहीत. “चहा घेतला” असे म्हणतात, “चहा घेतली” असे नाही. 
काही इंग्रजी शब्द मराठीत वापरताना त्या शब्दाचे लिंग अर्थात gender बरोबरच लिहिले पाहिजे उदाहरणार्थ ते पेन, तो पेन नाही. कारण इंग्रजीत It is a pen असे म्हणतात आणि लिहितात, He is a pen असे नाही. किंवा सरळ लेखणी हा शब्द वापरावा! अशी अजून अनेक उदाहरणे देता येतील.  

आता इंग्रजीतले काही शब्द मराठीत बेमालूमपणे मिळसळले गेले आहे. Cup या शब्दाला पेला हा शब्द आहे पण बशी पेल्याबरोबरही छान दिसते आणि कपाबरोबरही!

काही वर्षांपूर्वी संगणकावर Unicode मध्ये देवनागरीत टंकलेखन उपलब्ध झाले, पाठोपाठच भ्रमणध्वनीवर म्हणजेच mobile phoneवरही सहज देवानागरीत टंकलेखन शक्य झाले. तोपर्यंत मराठीत लिहायचे असेल तर roman लिपीमधेच लिहावे लागायचे आणि त्यातूनही काही मजेशीर चुका घडत. समाजमाध्यमांवर फिरत असलेला हा विनोद वाचनात आला असेलच:
===========
एका मैत्रिणीची बायपास झाली. तिला दुसऱ्या मैत्रिणीने मेसेज केला:
“Ata tula udya marayala harakat nahi.
बायपास झालेल्या मैत्रिणीला चक्कर येणं बाकी होतं कारण तिने वाचलं “आता तुला उद्या मरायला हरकत नाही!” बिचारी नुकतीच एका जीवघेण्या आजारातून बरी झाली होती, त्यात असे काही वाचल्यावर परत तिच्या हृदयाचे ठोके चुकले असते. संदेश पाठवणारीला लिहायचे होते “आता तुला उड्या मारायला हरकत नाही”!
===========
यासाठीच संगणकावर आणि भ्रमणध्वनीवर मराठीत लिहायचे असेल तर देवनागरी लिपी वापरली पाहिजे. मराठी भाषेची लिपी देवनागरी आहे, roman नाही. आणि आपणच याचा आग्रह धरायला हवा. असे म्हणतात, “तुम्हाला हवा असलेला बदल तुम्हीच व्हा!” मग आपणच शुद्ध मराठी लिहिण्याची (हाती, संगणकावर आणि mobileवरही), बोलण्याची सुरुवात करूया आणि रोजच्या आचरणातही हीच सवय ठेवूया. 
आज एकाने समाज माध्यमांवर प्रश्न विचारला, “किती पिढ्यानंतर ‘Happy  Marathi Language Day!’ असे विचारण्याची वेळ येईल?” अशी वेळ येऊ न देणे सर्वस्वी आपल्याच हातात आहे. त्यासाठी मराठी भाषा आपणच जास्तीत जास्त वापरायला हवी आणि येणाऱ्या पिढयांनाही निग्रहाने शक्य तिथे मराठीचा वापर करायला शिकवले पाहिजे. म्हणूनच मी समाज माध्यमांवर मराठीत लिहिताना अन्य भाषांचा वापर टाळतो, आणि इंग्रजी शब्द वापरताना देवनागरीत त्या शब्दाचा उच्चार लिहिण्याऐवजी तो शब्द roman लिपीतच लिहितो. 

आफ्टर ऑल मराठी कंपल्सरी पाहिजे. कारण आपल्या मदरटंगमधून आपले थॉट्स जितके क्लिअरली एक्सप्रेस करता येतात, तितके फॉरीन लँग्वेजमधून करणं डिफिकल्ट जातं. इंग्लिश मात्र मस्ट बी ऑप्शनल.
– पु.ल. देशपांडे
संदर्भ :आमचे भाषाविषयक धोरण”
या अतिशय मार्मिक शब्दांत महाराष्ट्राच्या लाडक्या व्यक्तिमत्वाने मराठी भाषेवर होणाऱ्या इंग्रजीच्या आक्रमणाची दखलही घेतली आहे आणि खिल्लीही उडवली आहे.
या मराठी भाषा गौरव दिनानिमित्त दिग्गज मराठी कवी, संगीतकार आणि गायकांनी एक सुंदर गाणे बनवले आहे. या गीतात म्हणाल्याप्रमाणे मराठी भाषेचा अभिमान बाळगून आणि मराठी भाषा दिवसेंदिवस वृद्धिंगत होत राहील अशी आशा बाळगून आजच्या पुरता हा लेखनाचा उद्योग थांबवतो. 


दिवस अठ्ठावान्नावा. पान अठ्ठावान्नावे 
मराठी भाषा गौरव दिन
२७/०२/२०१८
मुलुंड, मुंबई‘लेखनाचा उद्योग’ची वर्षपूर्ती

साधारण एक वर्षांपूर्वी फुगेवाल्याच्या किस्सा समाज माध्यमांवर लिहून झाल्यावर लेखनाच्या या उद्योगाची, अर्थात ब्लॉगिंगची सुरवात झाली. या लेखन प्रवासात अडचणी अशा फार आल्याच नाहीत. आता, मनाला भावलेलं किंवा खुपलेलं लिहायचं, त्यात काय अडचणी येणार? इंटरनेट उपलब्ध नसणे किंवा फारफार तर फोनची बॅटरी संपणे! हो, मैत्र जीवाचे: पाच वर्षे, तेहेतीस वर्षे, चार वर्षे ही अख्खी ब्लॉगपोस्ट ब्लॉगरच्या  मोबाईल ॲपवरच लिहिली होती. 
दरम्यानच्या काळात ब्लॉग आणि ब्लॉगपोस्ट या दोन्हीमधला फरक कळला. म्हणजे लेखनाचा उद्योग हा ब्लॉग आणि वाचनाचा उद्योग ही ब्लॉगपोस्ट! वेगळ्या शब्दांत सांगायचं तर एखाद्या ब्लॉगमध्ये कदाचित एकाच विषयाला धरून वेगवेगळ्या ब्लॉगपोस्ट्स लिहायच्या आणि वेगळा विषय असेल तर वेगळा ब्लॉग लिहायचा हे लक्षात आलं. मग प्रवास वर्णनं लिहिण्यासाठी ट्रॅव्हल डायरीज् लिहायला सुरुवात केली आणि फोटोग्राफीबद्दल लिहिण्यासाठी, फोटो स्टोरीज लिहिण्यासाठी प्रकाशचित्रणाचा उद्योग हा वेगळा ब्लॉग तयार केला. गेल्या वर्षी एक भन्नाट दूरचित्रवाणी मालिका लोकप्रिय झाली, तिच्या बद्दल लिहिलेली ब्लॉगपोस्ट सर्वाधिक वाचली गेलेली पोस्ट आहे. स्वतःच्या जन्म शहराबद्दल कोणालाही आकर्षण आणि प्रेम असू शकते तसे मुंबईबद्दल मलाही आहे. म्हणूनच मुंबईबद्दलच्या माझ्या भावना ज्या जवळ जवळ दहा वर्षांपूर्वी इंग्रजीत लिहायला घेतल्या होत्या त्याही ब्लॉगपोस्ट स्वरूपात व्यक्त केल्या आहेत, त्याचबरोबर मुंबईचे स्पिरिट याबद्दल जे टोचते तेही शब्दबद्ध करून झालेय.

अशाप्रकारे गेल्या वर्षभरात या लेखनाच्या उद्योगाने बर्यापैकी बाळसे धरले आहे. प्रत्येक ब्लॉगपोस्टचा शेवट करायची कल्पना कशी सुचली हे कथा लेखन या ब्लॉगपोस्टमध्ये लिहिले आहे. म्हणून ३१/१२/२०१७ रोजी एक आणि ०१/०१/२०१८ रोजी एक असे दोन दिवस सलग ब्लॉगपोस्ट्स प्रसिद्ध केल्या. त्यामुळे रोज एक ब्लॉगपोस्ट लिहिण्याचा माझा विचार आहे का असे अनेकांना वाटले असावे, पण तसा काही सध्या तरी मानस नाही. तरीही वर्षभरात बारा म्हणजे महिन्याला सरासरी एक ब्लॉगपोस्ट लिहिली आहे ‘लेखनाचा उद्योग’ मध्ये. ट्रॅव्हल डायरीज् मधल्या सहा आणि प्रकाशचित्रणाचा उद्योग मधल्या दोन धरल्या तर वर्षभरात २० ब्लॉगपोस्ट लिहून झाल्यात. एखाद्या नवख्या हौशी लेखकासाठी हे प्रमाण कसे आहे यावर जाणकारांनी टिप्पण्णी करावी. 
तर ब्लॉगरच्या मोबाईल ॲप मुळे कुठेही आणि कधीही ब्लॉगपोस्ट लिहिणे आणि संपादित करणे शक्य झाले. पण या ॲपमध्ये कोणती ब्लॉगपोस्ट कितीवेळा वाचली गेली ते कळत नाही, जे वेबसाईटवर कळते. तसेच याचे अपडेट्स प्ले स्टोअरवर उपलब्ध नाहीत. तसंच या ॲपवर अक्षराचा (फॉन्टचा) आकार कमी जास्त करता न येणे हीसुद्धा या ॲपची मर्यादा आहे. त्या मुळे यावर ब्लॉग लिहिणे तसे जिकिरीचे आहे. तरीही आयत्या वेळेच्या बदलांसाठी हे ॲप उपयुक्त आहे असेच म्हणता येईल. 
अशा प्रकारे  संगणक आणि भ्रमण ध्वनी (अर्थात mobile phone) या दोन्ही साधनांचा वापर करून ब्लॉगिंग चालू आहे. ते असेच चालू राहो, वेगवेगळे विषय सुचत राहून चांगले लेखन हातून घडो हीच प्रार्थना करून हा लेखनाचा उद्योग आजच्या पुरता थांबवतो. 
दिवस सोळावा पान सोळावे. 
सिंहगड रस्ता, पुणे 
१६/०१/२०१८ 

स्वागतम २०१८

नवी पहाट, नवी सकाळ, नवे वर्ष, नवे स्वप्न!

भल्याबुऱ्या आठवणींचं गाठोडं घेऊन २०१७ भूतकाळात गेलंय आणि अनंत संधी घेऊन २०१८ वर्तमानात आलंय. या संधी आहेत स्वतःबरोबरच समाजाच्या उन्नतीच्या, या संधी आहेत छोट्या छोट्या गोष्टींमधला आनंद शोधण्याबरोबरच मोठ्या उद्दिष्टांकडे वाटचाल चालू ठेवण्याच्या, या संधी आहेत सामाजिक भान जपण्याच्या आणि ते वृद्धिंगत करण्याच्या, या संधी आहेत गत वर्षात काही चुका झाल्या असतील तर त्या पुन्हा न करण्याचा संकल्प करण्याच्या. 
या आणि अशा अनेक संधी या वर्षरुपी पुस्तकाच्या प्रत्येक दिवसरूपी पानावर असतील, कधी त्या सहज सापडतील तर कधी त्या शोधण्यासाठी कदाचित थोडे कष्ट सोसावे लागतील. पण संधी सापडतील जरूर! दर वेळेस संधीचं सोनं होईलच असे नाही पण तसं करण्याचा प्रयत्न नक्कीच केला पाहिजे. यश मिळणं न मिळणं हे करत्या कारवित्याच्या हाती असतं. अशा प्रकारे वाटचाल करताना एक सोपा मंत्र ध्यानी ठेवला तर बऱ्याच गोष्टी सोप्या होतील:
आपण ज्या गोष्टी करतो, ज्या गोष्टींवर आपला ताबा असतो त्या गोष्टींवर श्रद्धा ठेवणे आणि ज्या गोष्टी आपल्या हातात नाहीत त्याबाबतीत सबुरी ठेवणे!
अशी श्रद्धा आणि त्या जोडीला परमेश्वरावर भक्ती असली की कार्यसिद्धीस येणाऱ्या अडथाळ्यांची तीव्रता कमी होते. या दोन्हीपैकी एकाही गोष्टीचा अभाव किंवा कमतरता असेल तर अपेक्षित परिणाम दिसत नाहीत किंवा उशीरा दिसतात, जेव्हा कदाचित वेळ निघून गेलेली असते. त्यामुळे अशी वेळ निघून जाण्याची वेळ गत वर्षात आली असल्यास त्यापासून धडा घेऊन अशी वेळ परत न येण्याचा आज नव वर्ष दिनीच संकल्प करूया. 
आपल्या रोजच्या व्यावसायिक जीवनात भरपूर व्याप असतात, ताण तणाव असतात. ते कमी करण्यासाठी आपल्या कचेरीत stress management ची शिबिरे होत असतील त्याला जाण्याबरोबरच काही सोप्या युक्त्या करता येतील. घरात पाळीव प्राणी असणं हे असा ताण तणाव कमी करण्याचं उत्तम साधन आहे असं म्हणतात. पण कुत्रा मांजर पाळणं सगळ्यांनाच शक्य होतं असं नाही. मग आपल्या राहत्या घराच्या वसाहतीत (society/colony मध्ये) काही कुत्रे मांजरी असतील तर त्यांच्याशी फटकून वागण्यापेक्षा त्यांना कधीतरी खायला देणं हाही बदल चांगला आहे. तसंच कामाच्या ठिकाणी जाता येता आवडतं संगीत ऐकणे हाही ताण तणावातून मुक्त होण्याचा एक चांगला उपाय आहे बरं का! एखादा छंद जोपासताना तोच छंद असलेल्या पण जरा वेगळ्या स्तरावर त्याला जोपासणाऱ्या, पूर्णपणे अपरिचित लोकांशी संपर्क साधून त्यांच्याशी त्या विषयावर चर्चा करता येईल. समाज माध्यमांवर त्या त्या छंदाशी संबधीत समूह शोधून त्यांचा सदस्य होणे, आपले काम सादर करणे, इतरांचे काम पाहणे आणि या संवादातून, देवाणघेवाणीतून त्या विषयातलं आपलं ज्ञान वाढवणं हा एक आनंददायी प्रकार आहे. 

या आणि अशा छोट्या छोट्या गोष्टींमधून आपल्याला अफाट आनंद मिळून ताण तणाव कमी होण्यास मदत होऊ शकते. अर्थात हे मला सुचलेले, पटलेले आणि उमगलेले काही मार्ग आहेत आनंदी राहण्याचे. प्रत्येकाला आपापले मार्ग स्वतःच शोधून त्यावर वाटचाल करायची आहे. आणि मी काही तत्वज्ञ नाही कोणाला मार्गदर्शन करायला. या सगळ्या अनुभलेल्या गोष्टी इथे मांडत आहे, एवढंच!

काल ३६५ पानांचं एक पुस्तक मिटून आज ३६५ पानांचंच अजून एक कोरं पुस्तक उघडलंय. त्याच्या प्रत्येक पानावर काही ना काही चांगलं लिहिण्याचा उद्योग या वर्षीही चालू ठेवणार आहे. भेटू लवकरच पुढच्या एखाद्या पानावर!

दिवस पहिला पान पहिले!
मुलुंड मुंबई 
०१/०१/२०१८ 
काय दिलं २०१७ ने?

काय दिलं २०१७ ने? बरंच काही! 

माझ्या देशाची पत आंतरराष्ट्रीय मंचावर खूपच सुधारली. त्या सुधारणेचा आलेख चढताच आहे आणि चढताच राहील! राष्ट्रीय पातळीवर काही महत्वपूर्ण आर्थिक निर्णय आणि बदललेली कररचना यांचाही हातभार लागला यात. आता काही मूलगामी बदल केले की त्याचे बरे वाईट परिणाम होतात, तसे या बदलांचेही झालेत. पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, की दुचाकी किंवा चारचाकी गाडी वळवणे सोपे असते पण लोहमार्गावरून जाणारी ट्रेन रूळ बदलताना रुळांचा आवाज होतोच. त्याचप्रमाणे सवाशे कोटी लोकसंख्येच्या देशाची घडी व्यवस्थित बसवताना थोडी खडखड, थोडा कोलाहल होणारच! तरीही एकंदरीत माझ्या देशाचं भविष्य उज्ज्वल आहे हे कोणीही मान्य करेल.  

गेल्या वर्षीपर्यंत काहीशे कोटी रुपयांची गोष्ट करणारी चित्रपट सृष्टी “बाहुबली द कन्क्लुजन” या अतिभव्य चित्रपटामुळे हजारो कोटी रुपयांच्या गोष्टी करू लागली. बेचाळीस वर्षांपूर्वी जसा “शोले” ट्रेंड सेटर होता तसाच यंदा “बाहुबली द कन्क्लुजन” हा चित्रपट ट्रेंड सेटर ठरला. एक पडदा चित्रपट गृह असो वा मल्टिप्लेक्स, सगळीकडे याने गर्दी खेचली. परदेशांत तेथील स्थानिक भाषांतही हा चित्रपट प्रसिद्ध झाला. 

मराठी चित्रपटांबद्दल बोलायचं तर वर्षाच्या सुरुवातीला आलेला “ती सध्या काय करते?” बराच लक्षवेधी ठरला. शाळकरी वयात निर्माण झालेलं प्रेम तारुण्यातही, दोघांचे मार्ग वेगवेगळे झायावरही कसं टिकू शकतं याचं छान चित्रण होतं यात. तीन वेगवेगळ्या कलाकारांनी एकाच पात्राची वेगवेगळ्या वयातील भूमिका करण्याचा प्रयोग यशस्वी झाला असंच म्हणता येईल. याच बरोबर फास्टर फेणे, बापजन्म, हृदयांतर, मुरांबा, कच्चा लिंबू या सारखे भरपूर आशयघन मराठी चित्रपट या वर्षात आले आणि त्यांनी प्रेक्षकांची पसंती मिळवली.

भारतीय क्रिकेटपटुंच्या आयुष्यावर एकूण तीन चित्रपट प्रदर्शित झाले गेल्या दोन तीन वर्षांत. पैकी दोन चित्रपटांत वेगवेगळ्या अभिनेत्यांनी त्या त्या क्रिकेटपटुंच्या भूमिका केल्या पण क्रिकेटच्या देवाची भूमिका कोण करणार? मग चित्रपट बनवताना तो देवच शतकोटी स्वप्ने घेऊन रुपेरी पडद्यावर अवतरला!

दूरचित्रवाणीवरही या वर्षात खूप नवे प्रयोग झाले. वर्षानुवर्षे चालणाऱ्या दैनंदिन मालिकांना कंटाळलेल्या प्रेक्षकांना मिनी सिरीज या प्रकाराशी ओळख करून दिली ती रुद्रमने. भक्कम कथानकासह अनेक जमेच्या बाजू असलेली ही मालिका ७० – ७५ भागांचीच होती. नजीकच्या भविष्यात अशा अजून मालिका बघायला मिळतील अशी आशा करूया. या मालिकेमुळेच मित्र परिवारातही थोडी वाढ झाली. 

या मालिकेबद्दल लिहिलेल्या ब्लॉगपोस्टमुळे हा लेखनाचा उद्योग थोडा जास्त लोकप्रिय झाला. आणि त्यामुळे हा उद्योग चालू ठेवण्याचा उत्साहही वाढला. मी काही सिद्धहस्त वगैरे लेखक नाही. जे मनाला भावते किंवा टोचते ते साध्या सोप्या शब्दांत मांडतो इतकंच. सुदैवाने चांगला वाचकवर्ग या ब्लॉगला मिळालाय त्यामुळे हा उद्योग मी चालू ठेवणार आहे. 

या वर्षात आणखीन एक नवीन उद्योग सुरू केला, सुरु झाला असं म्हणणं जास्त योग्य ठरेल. आयुष्यात पहिल्यांदाच शिक्षक झालो. एक नवं दालनच उघडलं! आता हा उद्योगही बाळसं धरतोय. या बद्दल सविस्तर परत कधीतरी. 

तर एकंदरीत २०१७ या वर्षाने अनेक चांगले अनुभव दिले, उमेद दिली, उत्साह दिला आणि मित्र दिले. येणारे वर्ष, तुम्ही कोणत्याही वयाचे असलात तरीही अठराच वर्षे वयाचे आहात याची आठवण करून देणारे आहे. २०१८ म्हणजे looking 20 feeling 18 असंच काहीसं नाहीये का?

या वर्षरुपी पुस्तकाच्या दिवसारूपी पानांवर खूप काही लिहिले गेले आणि ते कायम स्मरणात राहील. या पुस्तकाची थोडी पाने चाळल्यावर काही चांगल्या वाईट गोष्टी सापडल्या, त्यांची आठवण सोबत ठेवून वर्षभर उघडे असलेले हे ३६५ पानांचे पुस्तक आज मिटत आहे. पुढील वर्षी नवीन आशा आकांक्षा घेऊन अजून एक कोरे पुस्तक उघडायचे आणि त्याच्या प्रत्येक पानावर काही ना काही लिहायचे, अशी इच्छा ठेवून आजच्यापुरता आणि या वर्षापुरता हा लेखनाचा उद्योग थांबवतो!

दिवस तीनशे पासष्टावा पान तीनशे पासष्टावे!

३१/१२/२०१७ 
मुलुंड मुंबईमैत्र जीवाचे: पाच वर्षे, तेहेतीस वर्षे, चार वर्षे

हा लेखनाचा उद्योग, हा ब्लॉग जरा जास्त मोठा झालाय. ४२ वर्षांचा मागोवा घ्यायचा म्हणजे लांबी वाढणारच. कृपया सयंमाने वाचावा ही विनंती!!

सन १९७५. दादर मुंबई.

त्या वर्षीचा दसरा होता. माझ्या बालमोहन विद्यामंदिर शाळेच्या प्रथेप्रमाणे वयाची अडीच वर्षे पूर्ण झाल्यानंतरच्या दसऱ्याला शाळेत प्रवेश घेतला होता. माझे बाबा याच शाळेचे विद्यार्थी. सहाजीकच माझी मोठी बहीण आणि मी, दोघेही बालमोहनमध्येच जाणार हे ठरलेलं होतं! पहिल्या दिवशी आई बाबा दोघेही आले होते मला शाळेत सोडायला. दसरा सण मोठा म्हणून जरा नव्यातले कपडे घालून गेल्याचं आणि शाळेसमोर शिवाजीउद्यानाच्या, नवीन प्रचलित नावानुसार ‘शिवतिर्थाच्या’ कट्ट्यावर बसून रडून झाल्याचं आज ४२ वर्षांनंतरही आठवतंय. शाळेच्या प्रथेप्रमाणे “छोटा शिशू” या वर्गात माझा प्रवेश झाला होता आणि एक नवं विश्व सामोरं आलं होतं. 

ग म भ न गिरवायला सुरुवात झाली होती, “श्री”काराशी ओळख झाली होती, अक्षर ओळख व्हायला लागली होती. मधल्या सुट्टीत डब्यातला खाऊ खाणे हा एक नवा उद्योग मागे लागला. मला त्या वयात पोळीला भाजी लावून खाण्यात जास्त वेळ लागत असे. म्हणून आईने एक शक्कल लढवली. पोळीमध्ये भाजी भरून त्याचा रोल, गुंडाळी करून दिली डब्यात. त्यामुळे मधल्या सुट्टीत डबा पुर्ण संपून “ओता ओती” करायला वेळ शिल्लक राहू लागला. नाहीतर शिपाई वर्ग झाडायला आला तरी आमची स्वारी पोळी भाजीच खात असायची! 

तर “ओता ओती” हा एक पाण्याशी खेळायचा प्रकार होता. एका बादलीत पाणी असे ते एका प्लास्टिकच्या तपेलीत घेऊन बाटलीत भरणे असा साधा खेळ होता. पण त्या तपेलीतले पाणी बाटलीत सरळ पडेल तर शप्पथ! थोडे पाणी बाटली ज्यावर ठेवलेली असे त्या लाकडी घडवंचीवर (स्टुल), थोडे जमीनीवर, थोडे अंगावर सांडून उरलेच तर बाटलीत पाणी जात असे. या खेळात एक साधी शिकवण होती. निमुळत्या तोंडाच्या बाटलीत पाणी भरायचं असेल तर बाटलीच्या तोंडात जाईल अशी नळी असलेलं आणि त्याचं स्वत:चं तोंड बाटलीच्या तोंडापेक्षा मोठं असेल असं काहीतरी पाहीजे. मग ताईंनी येऊन बाजूलाच असलेलं नरसाळं म्हणजे फनेल त्या बाटलीत अडकवायला सांगितलं. त्यानंतर या ओता ओतीच्या खेळात वेगळीच मजा यायला लागली. त्या नरसाळ्याची नळी बाटलीच्या तोंडापेक्षा लहान असल्यामुळे बाटलीतून परत बादलीत पाणी टाकताना नरसाळं बाटलीला उलटं लावून, म्हणजे नरसाळ्याची नळी बाहेर ठेवून बादलीत पाणी ओतायला सुरुवात केली. आणि अरुंद नळीतून जास्त जोरात पाणी येताना पाहून मजा यायला लागली! लहानपणी पाण्यात खेळायला मला खुप आवडत असे. मोठेपणी पाण्याशी संबंधितच काही काम करेन याचीच ती नांदी होती का? तर छोटा शिशू वर्गातून मोठा शिशू या वर्गात गेल्यावर बादलीही मोठी झाली आणि मग बाटलीच पाण्यात बुडवून भरायचा “शॉर्टकट” लक्षात आला!! आणि बाटली बादलीत बुडवून त्यात पाणी भरताना येणाऱ्या बुडबुड्यांच्या आवाजाची मजा यायची. 

या सगळ्या शिक्षणाबरोबर आणि खेळण्याबरोबर नवीन मित्र मैत्रीणीही बनत होते. त्यांच्याबरोबर खेळणे चालू होते. शाळा सुटल्यानंतर आई किंवा बाबा घरी न्यायला येईपर्यंत शाळेच्या इमारतीभोवतीच्या अंगणात पकडापकडी खेळण्यात वेळ मस्त जायचा. शाळेपासून लांब माहीम आणि वरळी या भागात रहाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बसची व्यवस्था केली होती. बाकी शिवतिर्थाच्या आसपास रहाणारी माझ्यासारखी मुलं चालतच ये जा करत शाळेत, अर्थात आपापल्या पालकांसोबत! शाळा सुटल्यानंतर बसने जाणारी मुलं गेल्यावरही उरलेल्या मुलांचं खेळणं, त्यांचे पालक आल्यानंतरही चालूच असे.

आमच्या वर्गात एक टॉमबॉईश (याला मराठी प्रतिशब्द नाही मिळाला मला!) मुलगी होती, त्या वयातल्या मुलींच्या सरासरी उंची पेक्षा जरा जास्त उंच आणि मुलींचे कपडे न घालता मुलांसारखे कपडे घालणारी. शिक्षकांची बोलणी खाऊनही काहीही फरक पडत नसे त्यात! बालवर्गापर्यंत गणवेष नव्हता. पण पहिलीत गेल्यापासून गणवेष सक्तीचा झाल्यावर हा प्रकार बंद पडला.  

इयत्ता पहिलीच्या आधीच्या वर्गांना आमच्या बालमोहन विद्यामंदिरात छोटा शिशू वर्ग, मोठा शिशू वर्ग आणि बालवर्ग असं म्हणतात. आणि हे वर्ग शिवतिर्थाच्या समोरच्या जुन्या इमारतीत होत असत. जिथे बालमोहन विद्यामंदिरचे संस्थापक आणि शिक्षण महर्षी कै. दादा रेगे याचं निवासस्थानही होतं तेव्हा. या इमारतीतल्या खोल्यांमध्ये काही तास होत असत तर काही तास अंगणात. इमारतीच्या कुंपणाला धरून काही वाफे होते ज्यात फुलझाडं होती. बालवर्गात असताना एकदा आमचा एक तास असाच त्या अंगणात होता. सगळी मुलं तीन रांगामधे शांतपणे बसून (हे अशक्य वाटत असलं तरी खरं आहे बरं का!) शिक्षकांची वाट पहात होती. नाही म्हणायला थोडी चुळबुळ चालू होती पण दंगा नव्हता. मी तेव्हा त्या वाफ्यांच्या सगळ्यात जवळ म्हणजे कुंपणाजवळ बसलो होतो आणि माझ्यापुढे तीन चार ओळी सोडून बसलेल्या एका मुलाकडे त्याच्या एका विचित्र कृतीमुळे माझं लक्ष गेलं. काही तरी चघळून तो बाजूच्या वाफ्यात थुंकला आणि त्या थुंकीचा रंग हिरवा होता. बहुदा बाजूच्या वाफ्यातल्या झाडाची पाने खाल्ली असावीत. मला हे तेव्हा काही कळलं नाही आणि मी त्यानंतर बराच वेळ हिरवी थुंकी काढायचा प्रयत्न करत बसलो होतो!

माझा जन्म गौरीपुजनाच्या दिवशीचा असल्यामुळे वाढदिवस गणेशोत्सवाच्या आसपासच येतो बरेचदा. तर बाल वर्गात असताना बहुदा ऋषीपंचमीला माझा वाढदिवस आला होता. नवीन कपडे घालून मी शाळेत गेलो होतो. गणेशोत्सव चालू असल्यामुळे रोजच्या प्रार्थने बरोबर गणपतीची आरती आणि नंतर “घालीन लोटांगण….” हे भजनही व्हायचं. मला आठवतंय, त्या दिवशी माझा वाढदिवस म्हणून आणि मी विनंती केली म्हणून या भजनातल्या शेवटच्या ” हरे राम हरे राम, राम राम हरे हरे, हरे कृष्ण हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण हरे हरे” या ओळी दोनदा म्हणण्याऐवजी तीन वेळा म्हटल्या गेल्या होत्या…… 

अशी धमाल मस्ती करत बालवर्गातून पहिलीत आलो आणि वर्गातल्या मुलांबरोबर मैत्री अधिकच घट्ट व्हायला लागली होती. पहीलीपासून दहावीपर्यंतचे वर्ग मधुकर राऊत मार्गावरच्या नवीन इमारतीत भरतात. या इमारतीला मोठी शाळा म्हणत आणि शिवतिर्थासमोरील इमारतीला छोटी शाळा म्हणत. ही मोठी शाळा घरापासून थोडी जवळ होती छोट्या शाळेपेक्षा. माझा वर्ग आणि माझ्या मोठ्या बहिणीचा वर्ग भरण्याची आणि सुटण्याची वेळ एकच असे मग आम्ही एकत्र चालत शाळेत जात येत असू. आमच्या बरोबरच आमच्याच इमारतीत रहाणारी माझी एक बालमैत्रीणही शाळेत जात येत असे. त्यामुळे आमच्या आईबरोबरच तिच्या आईचाही आम्हाला शाळेत नेण्या आणण्याचा त्रास वाचला होता.

पहीलीत असताना सतरंजीवर बसून समोरच्या बाकाचं झाकण उघडून त्याच्या आत दप्तर आणि डबा ठेवायची पद्धत होती. काही वर्गमित्र दप्तरात खाऊचा डबा आणि पाण्याची बाटली घेऊन येण्याऐवजी हातात धरायची छोटी कडी असलेल्या प्लास्टिकच्या छोट्या पिशवीत (आज आपण ज्याला कॅरी बॅग म्हणतो तशी पिशवी नव्हे) डबा बाटली आणत असत. ते बघून मी आईकडे तशीच एक बास्केट मागितली आणि ती लगेच मिळाल्या मुळे मीही खुश झालो होतो. तर मधल्या सुट्टीत या बास्केट मधून डबा काढून खाण्याची मजा वाटत असे आणि डबा खाण्याचा वेगही थोडा वाढला होता. त्यामुळे पोळी भाजीची गुंडाळी बंद झाली होती. मित्र मैत्रीणींमध्ये डबा वाटून खाणं सुरू झालं होतं. एखाद्या मित्राला किंवा मैत्रीणीला एखादी भाजी आवडते म्हणून ती भाजी दुसऱ्या कोणी डब्यात आणायची असंही कधीकधी होत असे. डबा खाताना एकदा एका मित्राशी वाद झाला होता पोळी कोणती आणि चपाती कशाला म्हणायचं या वर! डबा खाऊन झाल्यावर खेळायला जाण्यात मात्र काहीही फरक पडला नव्हता. असंच एकदा मधल्या सुट्टीत मी आणि एक मित्र भिंतीवर रंगवलेल्या भारताच्या नकाशासमोर उभे होतो. त्याने “गया” या शहराच्या नावाकडे बोट केले आणि तो तिथून निघून गेला! बहुदा “मैं यहांसे गया!” असं सांगायचं होतं त्याला. तो मित्र तिथून गेला तो चार वर्षांपूर्वी भेटला एकदम!!

एकदा शाळा सुटताना माझ्या बुटाची नाडी सुटली होती आणि मला ती व्यवस्थित बांधता येत नव्हती. तेव्हा एका मित्राने ती बांधून दिली. त्याने नाडी इतकी विचित्र प्रकारे बांधली की घरी आल्यावर नाडी सोडवण्यात बराच वेळ आणि शक्ती खर्ची पडली होती!

दिवाळीच्या सुट्टीतला अभ्यास आणि त्यासाठीची खास वही हा दिवाळीतल्या फटाक्यांइतकाच आकर्षणाचा विषय असे. दिलेला अभ्यास करणे आणि त्या जोडीला ती वही छान छान नक्षी काढून आणि काही रंगीत चित्रे चिकटवून सजवणे हा प्रकारच अभ्यासापेक्षा जास्त आवडत होता.  एकमेकांच्या वह्या आणि त्यांची सजावट पहाणे हा सुट्टीनंतर शाळा परत चालू झाल्यावरच्या पहिल्या दिवसाचा कार्यक्रम ठरलेला असे.

शाळेची वार्षिक सहल (जी आम्ही वर्ग मित्र मैत्रीणी अजूनही आयोजित करतो) ही म्हणजे एक पर्वणीच असे. शाळेच्याच बसमधून ही सहल जात असे. दुसरीतली सहल गेटवे ऑफ इंडियाला गेली होती आणि माझं नशीब थोर म्हणून जाताना दादासाहेब रेग्यांच्या शेजारी बसायची संधी मिळाली होती! त्यांचा शेजारी बसण्याचा आनंद वर्णन करायाचा नसतो, फक्त अनुभवायचा असतो!! आमच्या पिढीचं नशीब महान म्हणूनच आम्हाला त्यांच्यासारखे मुख्याध्यापक मिळाले!!! ज्या बसमध्ये दादा असत त्यातली सगळी मुलं आणि मुली एकदम चिडीचुप. बाकीच्या बसमधल्या मुलांना बडबड करायला बऱ्यापैकी मोकळीक असे. गेटवेला पोहोचल्यावर समुद्राकडे बघून, “केवढा मोठा समुद्र. पाणीच पाणी. अबब किती हे पाणी!” हे दादांचे शब्द अजूनही कानात घुमतायत!! त्या सहलीत एका मित्राला प्रश्न पडला होता, “भाऊचा धक्का कुठे आहे?” गेटवेच्या जवळ जो दिपस्तंभ आहे समुद्रात त्याच्याकडे हात करून दिले ठोकून, ” तो बघ भाऊचा धक्का.” वास्तविक भाऊचा धक्का म्हणजे काय आणि तो गेटवेवरून दिसतो का नाही हे मला तेव्हा काहीही माहीत नव्हते!

उन्हाळी सुट्टीच्या आधी कैरीचं पन्हं आणि कलिंगडाची फोड, श्रावणी सोमवारी चणे फुटाणे विद्यार्थ्यांना देण्याच्या काही छान प्रथा आहेत शाळेच्या! शाळेच्या विद्यार्थ्यांना सर्व शिक्षक स्वत:च्या मुलांप्रमाणेच वागवत असत. आज या आठवणींनीही भरून येतं!

सन १९८०. दादर मुंबई

दुसरीतून तिसरीत जाताना काही कारणास्तव आम्ही मुंबई सोडून गेलो. तेव्हा हे सगळे मित्र मैत्रीणी परत कधी भेटतील का? कुठे भेटतील? नवी शाळा कशी असेल? तिथेही असेच मस्त मित्र मैत्रीणी मिळतील का? असे प्रश्न पडण्याचं आणि त्यांची उत्तरं शोधण्याचं ते वय नव्हतं. आई बाबांनी नेलं तिथे आम्ही गेलो!

चौथीत असताना एकदा दादरला एका लग्नाला आलो होतो. तेव्हा शाळेत गेलो असताना चौथीच्या वर्गाच्या दारात उभा राहीलो. एका मित्राने लगेच ओळखलं मला, “हा चेतन आपटे, दुसरीत होता वर्गात!” त्या तासाच्या ताईंनी वर्गात बोलवण्याआधीच मी तिथून धूम ठोकली होती.

मी पुण्यातल्या भावे हायस्कूलमधे शिकत मोठा होत होतो आणि हे बालमोहनचे बालमित्र मुंबईत मोठे होत होते. सातवीत का आठवीत असताना एकदा अचानक बालमोहनची एक बालमैत्रीण पुण्यात भेटली होती. काय बोललो तिच्याबरोबर हे आता एवढं आठवत नाही पण आनंद नक्कीच झाला होता!! 

मी इंजिनिअर झालो, कारकिर्दीत स्थिरावलो, तसे हे सगळे बालमित्रमैत्रीणीही आपापल्या व्यावसायिक आयुष्यात स्थिरस्थावर झाले, कोणी परदेशी गेले. पण मी मुंबईत नसल्याने माझा संपर्क तुटल्यातच जमा होता यांच्याशी. पण काही नावं मला आठवत होती. एक मैत्रीण मधुकर राऊत मार्गावरच्या शाळेच्या इमारतीशेजारील दुसऱ्या एका इमारतीत रहात असे. आमचे पुण्यातील एक स्नेही आणि शेजारी त्यांच्या नोकरीनिमित्त दादरला मधुकर राऊत मार्गावरच अन्य एका इमारतीत रहात असत. त्यांना भेटायला गेलं असताना या मैत्रीणीची आठवण आली. ती मैत्रिण त्यावेळेसही तिथेच रहात असे हे काही तेव्हा माहीत नव्हतं. लहानपणी तिच्याकडे खेळायलाही गेलो होतो अनेकदा.

नोव्हेंबर २००७, पुणे.

असं सगळं सुरळीत चालू असताना मी नोकरीसाठी पुन्हा मुंबईत आलो. तेव्हाही काही कल्पना नव्हती की या बालमित्र मैत्रीणींबरोबर परत संपर्क साधला जाईल. 

इंटरनेटवरील समाज माध्यमे भारतीय जनमानसात रुढ आणि प्रचलित होण्याचा तो काळ होता. त्यामुळे आपल्यापासून दूर असणाऱ्या आपल्या स्नेहीजनांशी या समाज माध्यमांतून संपर्क साधणे सोपे होत होते. याचाच फायदा घेत मी पुण्याच्या भावे हायस्कूलमधल्या आणि मुंबईच्या बालमोहन विद्यामंदिरातल्या सवंगड्यांपैकी बहुतेकांना शोधून काढलं. 

जुन २०१३, मुंबई

बहुतेकांची चाळीशी ओलांडली होती किंवा काही महीने बाकी होते. त्यावर्षी आम्हाला दहावीची परीक्षा उत्तीर्ण होऊन २५ वर्षे झाली होती. समाज माध्यमांतून पुन्हा ओळख झालेल्या एका मैत्रीणीने (तीच, पुण्यात भेटलेली) मला दूरध्वनी करून सांगितलं की आपल्या दहावीच्या वर्गाच्या रौप्यमहोत्सवी वर्षाबद्दल स्नेहसंमेलन आयोजित केलंय. त्याची जागा आणि वेळ तिने मला सांगितली आणि मी लगेच होकार भरला. ते स्नेहसंमेलन अविस्मरणीय होतं! प्रचंड मोठ्या कालावधीनंतर परत एकदा जुन्या सवंगड्यांबरोबर संपर्क साधला जात होता. परत एकदा नवे स्नेहबंध निर्माण होत होते. परदेशी असलेले, मुंबईबाहेर स्थायिक झालेले बरेच वर्गमित्र या कार्यक्रमासाठी खास मुंबईत आले होते. 

बहुतेकांसाठी ती २५ वर्षानंतरची पहिली भेट होती पण माझ्यासाठी ती भेट ३३ वर्षांनंतरची होती. मला आश्चर्य वाटलं की एवढ्या काळानंतरही आमच्या आठवणी पुसट झाल्या नव्हत्या. पहिलीत असताना शाळेत वह्या नसत. रोजचा अभ्यास पाटीवर होत असे शाळेत. बहुतेकांच्या पाट्या काळ्या रंगाच्या होत्या पण माझी पाटी हिरवी असल्याची (जे माझ्याच लक्षात नव्हतं) आठवण याच स्नेहसंमेलनात अनेकांनी सांगितली. दुसरीतला भाऊच्या धक्क्याचा किस्सा मी सांगितल्यावर सगळ्यांना मजा वाटली!

हे समेंलन फक्त आमच्या वर्गाचे होते. पण लगेच महिनाभरात सन १९८८ मध्ये बालमोहनमधून दहावी उत्तीर्ण झालेल्या सर्व तुकड्यांचे एक मोठे समेंलन झाले, ज्यात अनेक शिक्षकही आले होते. तोही एक सुंदर अनुभव होता. सर्व शिक्षकांप्रति आदर व्यक्त करण्याची ती एक सुंदर संधी होती! काही जणांनी कला आणि अभिनय क्षेत्रातही नाव कमावलंय हेही तेव्हा समजलं. 

एक मित्र त्याच्या लहानपणी पुण्यात भावे हायस्कूलला होता, तो मुंबईत बालमोहनला आला आणि त्याच वर्षी मी भावे हायस्कूलला प्रवेश घेतला. पण गमंत म्हणजे त्याच्याशी भेट तेव्हा न होता या समेंलनांमध्ये झाली. दुसऱ्या एका मित्राचा डहाणूला कुक्कुटपालन व्यवसाय आहे. या दोन समेंलनांनंतर त्याच्या कुक्कुटपालन केंद्राजवळच्या घरी सहल झाली दोन दिवसांची. तेव्हा त्याने त्याच्या व्यवसायाची आणि हे केंद्र कसं चालवलं जातं याची भरपूर माहीती दिली. ज्याला आपण एक्झॉटिक व्हेजिटेबल्स म्हणतो अशा भाज्या वितरणाचा एका मित्राचा व्यवसाय आहे. तो शाकाहारी मित्रांसाठी काही भाज्या घेऊन आला होता डहाणूला.

जुलै २०१४ मुंबई 

रौप्यमहोत्सवी स्नेहसमेंलनाला काही खास नाव नव्हतं. पण एक वर्षानंतर झालेल्या समेंलनाचं जल्लोष असं बारसं झालं होतं. या जल्लोषच्या आयोजनात माझा खारीच्या वाट्यापेक्षाही छोटा वाटा होता! या जल्लोषचं स्वरूप जरा वेगळं होतं. बहुतेक मित्रांनी आपल्या कला सादर केल्या. गाण्याचे, समुह नृत्याचे आणि एकल नृत्याचे कार्यक्रम झाले. एकाने हिंदी चित्रपट सृष्टीतील कलाकारांच्या नकलांचा कार्यक्रम केला. याच मित्राने पुण्याजवळ वडगांवला एक घर विकत घेतलं त्याच सुमारास. पुढच्या महिन्यात तिकडे दोन दिवसांची सहल झाली.

जुलै २०१६ वसई 

जल्लोष हे सर्व तुकड्यांमधल्या मित्र मंडळींचं समेंलन होतं. त्या ऐवजी एका मित्राने पुढाकार घेऊन वसईला एके ठिकाणी एक सहल आयोजित केली. आपण ज्याला इव्हेंट मॅनेजमेन्ट म्हणतो तोच या मित्राचा व्यवसाय आहे! त्यामुळे सहलीचं ठिकाण आणि तिथली व्यवस्था उत्तमच असणार यात काही शंका नव्हती!

अशा खुप सहली आणि सणांच्या वेळच्या भेटीगाठींमधून ही बालमैत्री अधीकच घट्ट झाली आहे! शाळेत प्रवेश दसऱ्याला झाला म्हणून असेल कदाचित, पण दर वर्षी दसऱ्याच्या दिवशी शाळेत जाणे, दहावीच्या वर्गात जाऊन थोडा वेळ काढणे हा एक वार्षिक नित्यक्रम झाला आहे. शाळेप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याची ही एक संधी आहे! माझ्यासाठी हे चौथं वर्षं आहे. दिवाळीच्या आधीही एकत्र भेटण्याची प्रथा आहे. गेल्या वर्षी या दिवाळी भेटीगाठी मी आयोजित केल्या होत्या आणि त्याला प्रतिसादही उत्तम मिळाला होता. 

ही मैत्री आता खुप दृढ झाली आहे. किंबहुना या सगळ्यांबरोबर नुसती मैत्री न रहाता सगळे एकमेकांचे “मैत्र जीवाचे” झाले आहेत. एकमेकांच्या सुख दु:खाच्या प्रसंगी ही दृढता, ही मैत्रीची घट्ट विण प्रकर्षाने दिसून आली आहे. आणि मला खात्री आहे की ही मैत्री अशीच कायम राहील. आता मैत्री आहे म्हणजे मनमुटाव, रुसवे, अबोला किंवा लहानपणीच्या भाषेत सांगायचं तर कट्टी करणं हे ही आलंच ओघानं! तेव्हा, “कट्टी तर कट्टी, बारं बट्टी बारा महीने बोलू नकोस, लिंबाचा पाला तोडू नकोस!” असं जरी सांगितलं असलं तरी “एक वर्षानंतर परत न विसरता बोलायला ये!” हा संदेशही असे त्यात. पण सुदैवाने असा अबोला धरायची वेळ गेल्या चार वर्षात आली नाहीये. आणि या पुढेही अशी वेळ न येवो ही सदिच्छा व्यक्त करून हा लेखनाचा उद्योग आता पुरता थांबवतो!

दिवस दोनशेचारावा पान दोनशेचारावे!

२३/०७/२०१७ 
मुलुंड, मुंबई 

रुद्रम – एक सुडाचा प्रवास


दूरचित्रवाणी वरील दैनंदिन मालिका हा प्रकार सुरू झाल्यापासून गेल्या पंचवीस एक वर्षांत रोज रात्री साडेनऊ वाजण्याची वाट पहायला लावणारी आणि ‘शनिवार रविवारची सुट्टी जास्तच लांबतीय’ असं वाटायला लावून सोमवारची वाट पाहायला लावणारी इतकी उत्कंठावर्धक मालिका कधी बनेल असं वाटलं नव्हतं! दुर्दैवाने दूरचित्रवाणी मालिका या सासू-सून, प्रेमाचा त्रिकोण/चौकोन/पंचकोन, अजून कुठला कोन आणि कुटुंबातील सदस्यांची एकमेकांवर कुरघोडी करण्याची अविरत कारस्थानं या बाहेर फार क्वचित पडल्या! श्वेतांबरा, एक शून्य शुन्य सारखे काही सन्माननीय अपवाद आहेत अर्थात, आणि ते त्या त्या काळात भरपूर गाजले.


काही मालिका या भावनाप्रधान असतात तर अन्य काही रहस्यमय असतात. आणि काही मालिका रुद्रम असतात! एकाच वेळेस भावनाप्रधानही आणि रहस्यमयही!! असा प्रकार दुर्मिळच आहे. झी युवा वाहिनीवरची रुद्रम ही मालिका सध्या बरीच गाजतेय, लोकप्रिय झालीय ती तिच्या याच वेगळेपणामुळे. मजबूत पटकथा, बऱ्यापैकी निर्दोष दिग्दर्शन, उत्तम चित्रीकरण, दर्जेदार लेखन आणि सर्व अभिनेत्यांचा काळजाला थेट भिडणारा अभिनय अशा सर्वच जमेच्या बाजू असताना रुद्रम लोकप्रिय झाली नसती तरच नवल होतं!

आनंद अलकुंटे यांनी इन्स्पेक्टर धुरत इतक्या ताकदीने उभा केलाय की त्यांच्या जागी अन्य कोणाची कल्पनाच करता येत नाही. स्वतःच्या मेहुण्यांच्या हत्येचे गूढ उलगडताना इन्स्पेक्टर धुरत यांनी हे नातं कधीच आणि कुठेही मध्ये येऊ दिले नाही आणि भर पत्रकार परिषदेत त्यांच्यावर नेमका हाच आरोप होतानाही आपला तोल कुठेही ढळू दिला नाही. या पत्रकार परिषदेच्या प्रसंगातला त्यांचा अभिनय लाजवाब होता. म्हणूनच रागिणी देसाई या प्रमुख पात्राची ही कथा असूनही इन्स्पेक्टर धुरत या पात्राचा प्रथम उल्लेख करावासा वाटला.

डॉक्टर मोहन आगाशे स्वतः प्रत्यक्षात मानसोपचार तज्ञ आहेत आणि त्यांची रुद्रममध्ये मानसोपचार तज्ञाचीच भूमिका आहे जी ते जगलेत असं म्हणणं वावगं ठरू नये. त्यांचा उल्लेख नाही झाला तर या मालिकेबद्दलचा कोणाताही लेख अपूर्णच राहील! संपूर्णपणे व्यावसायिक मानसोपचार तज्ञ साकारला आहे त्यांनी, जो रागिणीच्या आयुष्यात डोकावतो तर आहे पण गुंतत नाहीये. रागिणी ज्या परिस्थितीतून गेलीय आणि जातेय त्या परिस्थितीचे योग्य विश्लेषण करून, तिला अचूक प्रश्न विचारून तिच्याकडून खरी उत्तरं मिळवत आहेत आणि तिला तिच्या मानसिक अवस्थेतून बाहेर काढायचा प्रामाणिक प्रयत्न करताना दिसतात. त्यांच्यासारख्या दिग्गज अभिनेत्याबद्दल बोलावे तेवढे कमीच आहे!

सर्व पात्रे आणि कलाकार यांची गुंफण इतकी मस्त झालीय की अन्य कोणी अभिनेता अथवा अभिनेत्री त्या भूमिकेत पाहण्याची कल्पनाच करता येत नाही. मुक्ता बर्वे यांना एका लग्नाची दुसरी गोष्ट या मालिकेनंतर इतक्या वर्षांनी दूरचित्रवाणीवर पुन्हा पाहून अतिशय आनंद झाला! त्या एक उत्तम अभिनेत्री आहेत यात शंकाच नाही. अन्यायग्रस्त स्त्रीची व्यक्तिरेखा फार छान उभी केलीय त्यांनी. आई, वडील, नवरा, मुलगा आणि स्वतः रागिणी या छानशा पंचकोनी कुटुंबातले तीन कोन एका घडवून आणलेल्या अपघातात तोडले जातात आणि सुरू होतो एक सूडाचा प्रवास. हाच प्रवास आपल्याला सोमवार ते शुक्रवार रात्री साडेनऊ वाजता झी युवा वाहिनीसमोर खिळवून ठेवतोय! 

हा प्रवास सुरू करतानाच रागिणीला बहुतेक अंदाज आला असावा की याचा शेवट काय असेल म्हणूनच सुरुवातीपासूनच तिने स्वतःच्या सर्व हालचाली, सर्व कृत्ये यांचे स्वगत स्वरूपात चित्रीकरण करून ठेवले असावे आणि याच चित्रीकरणाचा वापर “फ्लॅशबॅक” सारखा करून प्रेक्षकांना रागिणीची पार्श्वभूमी, तिचा भूतकाळ सांगण्याची कल्पना भन्नाट होती. त्याच बरोबर हा “फ्लॅशबॅक” मर्यादित काळाचा ठेवला हीसुद्धा एक जमेची बाजू आहे. मालिका पाहायला सुरुवात केल्यावर अनेकांना अंदाज आला असेल की हा “फ्लॅशबॅक” मर्यादित भागांचा असेल, पूर्ण मालिका “फ्लॅशबॅक”मध्ये नसेल. अभय सातव त्याचं उपाहारगृह बंद करून घरी जाण्याच्या तयारीत असताना त्याला एकटं गाठून त्याच्याच गाडीत त्याला रागिणी बेशुध्द करते आणि निर्जन स्थळी नेऊन त्याच्या हत्येचा प्रयत्न करते, अशा थरारक प्रसंगातून या मालिकेची सुरुवात होते आणि अनेक धक्के – बरेचसे अनपेक्षित आणि कधीतरी अपेक्षित – देत कथा पुढे सरकते. 

अशा रहस्य कथांमध्ये कोणतेही पात्र आणायचे म्हणून आणलेले नसते कारण अशा कथांना उपकथानकांची गरज नसते. आखीव रेखीव कथा आणि पटकथा याच अशा मालिकांच्या यशाचे गुपित असतात. मग आपल्यासारखे सामान्य प्रेक्षक कधी सुहासला रागिणीचा फक्त शेजारी न समजता त्याचे रागिणीबरोबर प्रेम संबंध जोडू पहातो तर कधी त्याच्या व्यसनाधीन बाबांवर शंका घेतो! आधी म्हणाल्याप्रमाणे अन्य प्रकारच्या दैनंदिन मालिकांच्या कथानकाबद्दलही हे असे अंदाज बांधले जाऊ शकतात आणि ते बरेचदा खरेही ठरतात. पण रुद्रमासारख्या भावनाप्रधान रहस्य मालिकांचे यश यात असते की आजचा भाग बघून बांधलेला अंदाज उद्याच्या भागात खोटा ठरू शकतो आणि प्रेक्षक चालू भागातल्या कथानकात जास्त गुंततात! 

मगाशी “बऱ्यापैकी निर्दोष दिग्दर्शन” असा उल्लेख अशासाठी केला कारण काही चुका राहून गेलेल्या दिसल्या. एक म्हणजे रागिणी जिथे ती काम करते त्या वाहिनीवर बातम्या देताना दिसते तेव्हा त्या First News वाहिनीचे मानचित्र अर्थात logo त्या प्रक्षेपणात दिसत नाही. दुसरं म्हणजे रागिणीची बंदूक “कमी बोंबाबोंब करणारी” म्हणजे सायलेन्सर लावलेली असते तरीही त्यातून गोळी झाडल्यावर मोठा आवाज येतो. या बारीकसारीक गोष्टींवरचं दिग्दर्शकाचं लक्ष मालिकेला “चांगली मालिका” याकडून “उत्तम मालिका” याकडे नेते. पण रुद्रमची शक्ती स्थळे अर्थात plus points इतके आहेत की या छोट्या चुकांकडे दुर्लक्ष करता येते आणि म्हणूनच ही मालिका उत्तम आहे. 

फेसबुकवर जेव्हा केव्हा मी या मालिकेबद्दल लिहिले तेव्हा “#रुद्रम”, “#झीयुवा” असे hashtag वापरून लिहिले. नंतर एकदा “#रुद्रम” या hashtagवर click करून पाहिले तेव्हा “रुद्रम Fans” असा फेसबुक समूह असल्याचे लक्षात आले आणि लगेच त्याचा सदस्य झालो. कोणत्याही मालिकेच्या चहात्यांचा असा समूह असणं आणि त्याचे एक हजारावर सदस्य असणे ही म्हटलं तर नवलाची गोष्ट आहे! मला कधीही वाटलं नव्हतं की मी अशा कुठल्या दैनंदिन मालिकेला वाहिलेल्या फेसबुक समूहाचा सदस्य होईन. या समूहावर मालिकेबद्दल चर्चा झडत आहेत. गेला महिनाभर दररोज मीही त्यात भाग घेत आहे. या समूहाचे बरेचसे सदस्य एकमेकांना ओळखताही नसतील तरीही त्यांच्याशी साता जन्माची मैत्री असल्यासारखे सगळेजण या समुहावरच्या गप्पांमध्ये सहभागी होतायत! काही जणांचा एखादा भाग बघायचा राहात असेल तर कोणी त्या भागाचे सविस्तर वर्णन (स्वतःच्या विशेष टिप्पणीसह) करत आहेत तर कोणी दूरचित्रवाणी संचावर मालिका दिसत असताना त्याचे फेसबुकवर थेट प्रक्षेपण करत आहेत! या समूहात रुद्रममध्ये काम करणारे काही कलाकारही आहेत. मालिकेतल्या रहस्यांबद्दल सगळे सदस्य या समूहावर अंदाज बांधत असताना हे सर्व कलाकार त्याची गंमतही बघत असतील आणि आनंदही घेत असतील या गप्पांचा! 

आता मालिका शेवटाकडे आलीय. येत्या शुक्रवारी शेवटचा भाग प्रसारित होणार आहे. उत्कंठा तर शिगेला पोहोचली आहेच, बराचसा अंदाजही आला आहे शेवट काय असेल याचा. पण उत्कंठा तशीच ठेवून वेळेआधी रहस्यभेद ना होऊ देता मालिका संपवणं हे दिग्दर्शक आणि अन्य चमूचं कौशल्य असेल! मालिकेचे निर्माते, दिग्दर्शक, अभिनेते आणि पडद्यामागचे सर्व कलाकार प्रेक्षकांचा अपेक्षाभंग होणार नाही याची काळजी घेतील आणि कथेतील सर्व गुन्हेगारांना कायद्याने शिक्षा झालेले दाखवतील अशी अपेक्षा करून हा लेखनाचा उद्योग आजच्या पुरता थांबवतो!

दिवस तीनशे अठरावा पान तीनशे अठरावे

मुलुंड मुंबई 
बालदिन
१४/११/२०१७

 

Create your website at WordPress.com
Get started
%d bloggers like this: