रुद्रम – एक सुडाचा प्रवास


दूरचित्रवाणी वरील दैनंदिन मालिका हा प्रकार सुरू झाल्यापासून गेल्या पंचवीस एक वर्षांत रोज रात्री साडेनऊ वाजण्याची वाट पहायला लावणारी आणि ‘शनिवार रविवारची सुट्टी जास्तच लांबतीय’ असं वाटायला लावून सोमवारची वाट पाहायला लावणारी इतकी उत्कंठावर्धक मालिका कधी बनेल असं वाटलं नव्हतं! दुर्दैवाने दूरचित्रवाणी मालिका या सासू-सून, प्रेमाचा त्रिकोण/चौकोन/पंचकोन, अजून कुठला कोन आणि कुटुंबातील सदस्यांची एकमेकांवर कुरघोडी करण्याची अविरत कारस्थानं या बाहेर फार क्वचित पडल्या! श्वेतांबरा, एक शून्य शुन्य सारखे काही सन्माननीय अपवाद आहेत अर्थात, आणि ते त्या त्या काळात भरपूर गाजले.


काही मालिका या भावनाप्रधान असतात तर अन्य काही रहस्यमय असतात. आणि काही मालिका रुद्रम असतात! एकाच वेळेस भावनाप्रधानही आणि रहस्यमयही!! असा प्रकार दुर्मिळच आहे. झी युवा वाहिनीवरची रुद्रम ही मालिका सध्या बरीच गाजतेय, लोकप्रिय झालीय ती तिच्या याच वेगळेपणामुळे. मजबूत पटकथा, बऱ्यापैकी निर्दोष दिग्दर्शन, उत्तम चित्रीकरण, दर्जेदार लेखन आणि सर्व अभिनेत्यांचा काळजाला थेट भिडणारा अभिनय अशा सर्वच जमेच्या बाजू असताना रुद्रम लोकप्रिय झाली नसती तरच नवल होतं!

आनंद अलकुंटे यांनी इन्स्पेक्टर धुरत इतक्या ताकदीने उभा केलाय की त्यांच्या जागी अन्य कोणाची कल्पनाच करता येत नाही. स्वतःच्या मेहुण्यांच्या हत्येचे गूढ उलगडताना इन्स्पेक्टर धुरत यांनी हे नातं कधीच आणि कुठेही मध्ये येऊ दिले नाही आणि भर पत्रकार परिषदेत त्यांच्यावर नेमका हाच आरोप होतानाही आपला तोल कुठेही ढळू दिला नाही. या पत्रकार परिषदेच्या प्रसंगातला त्यांचा अभिनय लाजवाब होता. म्हणूनच रागिणी देसाई या प्रमुख पात्राची ही कथा असूनही इन्स्पेक्टर धुरत या पात्राचा प्रथम उल्लेख करावासा वाटला.

डॉक्टर मोहन आगाशे स्वतः प्रत्यक्षात मानसोपचार तज्ञ आहेत आणि त्यांची रुद्रममध्ये मानसोपचार तज्ञाचीच भूमिका आहे जी ते जगलेत असं म्हणणं वावगं ठरू नये. त्यांचा उल्लेख नाही झाला तर या मालिकेबद्दलचा कोणाताही लेख अपूर्णच राहील! संपूर्णपणे व्यावसायिक मानसोपचार तज्ञ साकारला आहे त्यांनी, जो रागिणीच्या आयुष्यात डोकावतो तर आहे पण गुंतत नाहीये. रागिणी ज्या परिस्थितीतून गेलीय आणि जातेय त्या परिस्थितीचे योग्य विश्लेषण करून, तिला अचूक प्रश्न विचारून तिच्याकडून खरी उत्तरं मिळवत आहेत आणि तिला तिच्या मानसिक अवस्थेतून बाहेर काढायचा प्रामाणिक प्रयत्न करताना दिसतात. त्यांच्यासारख्या दिग्गज अभिनेत्याबद्दल बोलावे तेवढे कमीच आहे!

सर्व पात्रे आणि कलाकार यांची गुंफण इतकी मस्त झालीय की अन्य कोणी अभिनेता अथवा अभिनेत्री त्या भूमिकेत पाहण्याची कल्पनाच करता येत नाही. मुक्ता बर्वे यांना एका लग्नाची दुसरी गोष्ट या मालिकेनंतर इतक्या वर्षांनी दूरचित्रवाणीवर पुन्हा पाहून अतिशय आनंद झाला! त्या एक उत्तम अभिनेत्री आहेत यात शंकाच नाही. अन्यायग्रस्त स्त्रीची व्यक्तिरेखा फार छान उभी केलीय त्यांनी. आई, वडील, नवरा, मुलगा आणि स्वतः रागिणी या छानशा पंचकोनी कुटुंबातले तीन कोन एका घडवून आणलेल्या अपघातात तोडले जातात आणि सुरू होतो एक सूडाचा प्रवास. हाच प्रवास आपल्याला सोमवार ते शुक्रवार रात्री साडेनऊ वाजता झी युवा वाहिनीसमोर खिळवून ठेवतोय! 

हा प्रवास सुरू करतानाच रागिणीला बहुतेक अंदाज आला असावा की याचा शेवट काय असेल म्हणूनच सुरुवातीपासूनच तिने स्वतःच्या सर्व हालचाली, सर्व कृत्ये यांचे स्वगत स्वरूपात चित्रीकरण करून ठेवले असावे आणि याच चित्रीकरणाचा वापर “फ्लॅशबॅक” सारखा करून प्रेक्षकांना रागिणीची पार्श्वभूमी, तिचा भूतकाळ सांगण्याची कल्पना भन्नाट होती. त्याच बरोबर हा “फ्लॅशबॅक” मर्यादित काळाचा ठेवला हीसुद्धा एक जमेची बाजू आहे. मालिका पाहायला सुरुवात केल्यावर अनेकांना अंदाज आला असेल की हा “फ्लॅशबॅक” मर्यादित भागांचा असेल, पूर्ण मालिका “फ्लॅशबॅक”मध्ये नसेल. अभय सातव त्याचं उपाहारगृह बंद करून घरी जाण्याच्या तयारीत असताना त्याला एकटं गाठून त्याच्याच गाडीत त्याला रागिणी बेशुध्द करते आणि निर्जन स्थळी नेऊन त्याच्या हत्येचा प्रयत्न करते, अशा थरारक प्रसंगातून या मालिकेची सुरुवात होते आणि अनेक धक्के – बरेचसे अनपेक्षित आणि कधीतरी अपेक्षित – देत कथा पुढे सरकते. 

अशा रहस्य कथांमध्ये कोणतेही पात्र आणायचे म्हणून आणलेले नसते कारण अशा कथांना उपकथानकांची गरज नसते. आखीव रेखीव कथा आणि पटकथा याच अशा मालिकांच्या यशाचे गुपित असतात. मग आपल्यासारखे सामान्य प्रेक्षक कधी सुहासला रागिणीचा फक्त शेजारी न समजता त्याचे रागिणीबरोबर प्रेम संबंध जोडू पहातो तर कधी त्याच्या व्यसनाधीन बाबांवर शंका घेतो! आधी म्हणाल्याप्रमाणे अन्य प्रकारच्या दैनंदिन मालिकांच्या कथानकाबद्दलही हे असे अंदाज बांधले जाऊ शकतात आणि ते बरेचदा खरेही ठरतात. पण रुद्रमासारख्या भावनाप्रधान रहस्य मालिकांचे यश यात असते की आजचा भाग बघून बांधलेला अंदाज उद्याच्या भागात खोटा ठरू शकतो आणि प्रेक्षक चालू भागातल्या कथानकात जास्त गुंततात! 

मगाशी “बऱ्यापैकी निर्दोष दिग्दर्शन” असा उल्लेख अशासाठी केला कारण काही चुका राहून गेलेल्या दिसल्या. एक म्हणजे रागिणी जिथे ती काम करते त्या वाहिनीवर बातम्या देताना दिसते तेव्हा त्या First News वाहिनीचे मानचित्र अर्थात logo त्या प्रक्षेपणात दिसत नाही. दुसरं म्हणजे रागिणीची बंदूक “कमी बोंबाबोंब करणारी” म्हणजे सायलेन्सर लावलेली असते तरीही त्यातून गोळी झाडल्यावर मोठा आवाज येतो. या बारीकसारीक गोष्टींवरचं दिग्दर्शकाचं लक्ष मालिकेला “चांगली मालिका” याकडून “उत्तम मालिका” याकडे नेते. पण रुद्रमची शक्ती स्थळे अर्थात plus points इतके आहेत की या छोट्या चुकांकडे दुर्लक्ष करता येते आणि म्हणूनच ही मालिका उत्तम आहे. 

फेसबुकवर जेव्हा केव्हा मी या मालिकेबद्दल लिहिले तेव्हा “#रुद्रम”, “#झीयुवा” असे hashtag वापरून लिहिले. नंतर एकदा “#रुद्रम” या hashtagवर click करून पाहिले तेव्हा “रुद्रम Fans” असा फेसबुक समूह असल्याचे लक्षात आले आणि लगेच त्याचा सदस्य झालो. कोणत्याही मालिकेच्या चहात्यांचा असा समूह असणं आणि त्याचे एक हजारावर सदस्य असणे ही म्हटलं तर नवलाची गोष्ट आहे! मला कधीही वाटलं नव्हतं की मी अशा कुठल्या दैनंदिन मालिकेला वाहिलेल्या फेसबुक समूहाचा सदस्य होईन. या समूहावर मालिकेबद्दल चर्चा झडत आहेत. गेला महिनाभर दररोज मीही त्यात भाग घेत आहे. या समूहाचे बरेचसे सदस्य एकमेकांना ओळखताही नसतील तरीही त्यांच्याशी साता जन्माची मैत्री असल्यासारखे सगळेजण या समुहावरच्या गप्पांमध्ये सहभागी होतायत! काही जणांचा एखादा भाग बघायचा राहात असेल तर कोणी त्या भागाचे सविस्तर वर्णन (स्वतःच्या विशेष टिप्पणीसह) करत आहेत तर कोणी दूरचित्रवाणी संचावर मालिका दिसत असताना त्याचे फेसबुकवर थेट प्रक्षेपण करत आहेत! या समूहात रुद्रममध्ये काम करणारे काही कलाकारही आहेत. मालिकेतल्या रहस्यांबद्दल सगळे सदस्य या समूहावर अंदाज बांधत असताना हे सर्व कलाकार त्याची गंमतही बघत असतील आणि आनंदही घेत असतील या गप्पांचा! 

आता मालिका शेवटाकडे आलीय. येत्या शुक्रवारी शेवटचा भाग प्रसारित होणार आहे. उत्कंठा तर शिगेला पोहोचली आहेच, बराचसा अंदाजही आला आहे शेवट काय असेल याचा. पण उत्कंठा तशीच ठेवून वेळेआधी रहस्यभेद ना होऊ देता मालिका संपवणं हे दिग्दर्शक आणि अन्य चमूचं कौशल्य असेल! मालिकेचे निर्माते, दिग्दर्शक, अभिनेते आणि पडद्यामागचे सर्व कलाकार प्रेक्षकांचा अपेक्षाभंग होणार नाही याची काळजी घेतील आणि कथेतील सर्व गुन्हेगारांना कायद्याने शिक्षा झालेले दाखवतील अशी अपेक्षा करून हा लेखनाचा उद्योग आजच्या पुरता थांबवतो!

दिवस तीनशे अठरावा पान तीनशे अठरावे

मुलुंड मुंबई 
बालदिन
१४/११/२०१७

 

Design a site like this with WordPress.com
Get started